Shah Rukh Khan Hospitalized : उष्माघातामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची प्रकृती खालावली असून उपचारांसाठी त्याला अहमदाबादमधील के. डी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर सामना (आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना) मंगळवारी, २१ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी आणि आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शाहरुख खान अहमदाबादच्या स्टेडियमवर हजर होता. या सामन्यानंतर शाहरुखची तब्येत बिघडली होती. प्राथमिक उपचारांनंतरही त्याला बरं वाटलं नाही. त्यामुळे त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर मात करत यंदाच्या आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख मैदानात हजर होता. सामना जिंकल्यावर संघ आणि केकेआरच्या चाहत्यांसह शाहरुखनेही विजयी जल्लोष केला. मात्र एका बाजूला केकेआरच्या विजयाचा आनंद साजरा केला जात होता. तर दुसऱ्या बाजूला शाहरुखची तब्येत बिघडली. त्यामुळे शाहरुखला रुग्णालयात दाखल केलं असून तिथे त्याच्यावर उपचार केले जात आहे. डिहायड्रेशनमुळे (शरिरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होणारा विकार) त्याची प्रकृती खालावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
अहमदाबादमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंशांचा पुढे गेला आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे रुग्ण उपचार घेत असल्याचं पाहायला मिळत आहे
गेल्या वर्षी नाकाला दुखापत, अमेरिकेत शस्त्रक्रिया
शाहरुख गेल्या वर्षी जून आणि जुलै महिन्यात एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमेरिकेला गेला होता. त्याच वेळी लॉस एंजेलिसमध्ये एका चित्रपटाचा चित्रिकरणादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया आणि काही दिवसांच्या उपचारांनंतर तो भारतात परतला होता.
हे ही वाचा >> “मी श्रीमंत बनू शकत नाही”, मनोज बाजपेयींचं वक्तव्य चर्चेत, अंबानींचा उल्लेख करत म्हणाले…
उष्माघात म्हणजे काय?
खूप वेळ, सतत कडक उन्हात काम केल्यानंतर, चालल्यानंतर उष्मापात होतो. त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघात किंवा सनस्ट्रोक. शरीराने मर्यादेपेक्षा जास्त उष्णता निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाची शारीरिक स्थिती निर्माण होते. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशात वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताचे प्रकार वाढत आहेत. महाराष्ट्रात, प्रामुख्याने मराठवाडा आणि नागपूर या भागात दरवर्षी उष्माघातामुळे नागरिकांच्या मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अशीच स्थिती यंदा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही आहे. देशामध्ये राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमधील नागरिकांना उष्णतेच्या तीव्र लाटांच्या झळांचा सामना करावा लागतोय. अहमदाबादमध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे.