बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याच्या मुंबईतील मन्नत या निवासस्थानाबाहेरचा रॅम्प तोडण्याचा खर्च मुंबई महानगरपालिका शाहरूखकडूनच वसूल करणार आहे. येथील स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिकेने गेल्या महिन्यात कारवाई करत हा रॅम्प तोडला होता. त्यानंतर आता या कारवाईसाठी लागलेला १ लाख ९३ हजारांचा खर्च पालिका शाहरूख खानकडूनच वसूल करणार आहे. महानगरपालिकेकडून यासंदर्भात ५ मार्च रोजी शाहरूखला नोटीसही पाठविण्यात आली आहे.
महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने आम्ही रॅम्प तोडण्यासाठीचा खर्च शिवाय रस्त्याचे झालेले नुकसान याची भरपाई म्हणून १ लाख ९३ हजार रुपये भरण्यासाठी शाहरुखला नोटीस पाठविल्याचे सांगितले. यासाठी त्याला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शाहरुखने या सात दिवसांत पैसे भरले नाहीत तर ही रक्कम त्याच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये जोडली जाईल. शाहरुख खानला मुंबई महानगरपालिका अधिनियम ४८९ (१) अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे.याअंतर्गत अवैधरित्या निर्माण केलेल्या इमारत, घर अथवा असे काहीही तोडण्याचा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याची तरतूद आहे.
शाहरुख या रॅम्पचा उपयोग त्याची व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी करत असे. पण याला अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी विरोध केला होता. त्यानंतर भाजप खासदार पूनम महाजन यांनी हा अवैध रॅम्प हटवण्यासाठी महापालिका आयुक्त सिताराम कुंटे यांना पत्र लिहून तक्रार केली होती. त्यानंतर पालिकेकडून शाहरुखला रॅम्प हटवण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. ही मुदत उलटून गेल्यानंतरही रॅम्प तसाच ठेवण्यात आल्याने महापालिकेने १३ फेब्रुवारी रोजी हा रॅम्प तोडला होता.
‘मन्नत’बाहेरील रॅम्प तोडण्यासाठी लागलेले १.९३ लाख शाहरूखकडूनच वसूल करणार
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याच्या मुंबईतील मन्नत या निवासस्थानाबाहेरचा रॅम्प तोडण्याचा खर्च मुंबई महानगरपालिका शाहरूखकडूनच वसूल करणार आहे.
First published on: 11-03-2015 at 12:25 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan asked to pay rs 193 lakh for ramp demolition outside mannat