2003 साली शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांचा बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपट ‘चलते चलते’ रिलीज झाला होता. या हिट चित्रपटात राणी मुखर्जीच्या आधी ऐश्वर्या राय-बच्चनला कास्ट करण्यात आले होते.
चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले होते; पण नंतर ऐश्वर्या रायला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. मग तिच्या जागी राणी मुखर्जीला कास्ट करण्यात आले. आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ऐश्वर्या रायला काढून टाकण्याबद्दल आणि राणी मुखर्जीच्या कास्टिंगबद्दल सांगितले आहे.
ऐश्वर्यासोबत हे गाणं शूट करण्यात आलं होतं…
‘रेडिओ नशा’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत, चित्रपटाचे दिग्दर्शक अझीझ मिर्झा यांना जेव्हा विचारण्यात आले की, ऐश्वर्या रायला चित्रपटातून का काढून टाकण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, “मला माहीत नाही. असो! हे असं क्षेत्र आहे, जिथे दुर्दैवानं आपण…” त्यांना विचारण्यात आले की, ऐश्वर्यासोबत बरेच सीन शूट करण्यात आले होते का? ते म्हणाले नाही, आम्ही फक्त प्रेम नगरिया हे गाणे शूट केले होते. आम्ही फक्त एका दिवसासाठी शूटिंग केले. दुर्दैवाने, गोष्टी आमच्या इच्छेनुसार घडल्या नाहीत आणि मग राणी चित्रपटाचा भाग बनली.”
जुही चावलाला का कास्ट केले नाही?
ही पहिलीच वेळ होती जेव्हा अझीझ मिर्झा यांनी शाहरुख खानसोबत जुही चावलाला कास्ट केले नव्हते. यापूर्वी त्यांच्या पहिल्या तीन चित्रपटांमध्ये जूही चावला आणि शाहरुख खान दिसले होते. जेव्हा अझीझ यांना विचारण्यात आले की, त्यांनी चित्रपटात जुही चावलाला का घेतले नाही? ते म्हणाले, “मला वाटलं होतं की, लोकांना काहीतरी वेगळं पाहायचं आहे. असं नाही की, राणी वाईट होती, राणी नेहमीसारखीच चांगली होती.”
तुम्हाला माहीत आहे का? अनेक जुन्या बातम्यांमध्ये असा दावा केला जातो की, ऐश्वर्या राय ‘चलते चलते’दरम्यान सलमान खानला डेट करत होती. सलमान खानने चित्रपटाच्या सेटवर गोंधळ घातला होता. त्यानंतर ऐश्वर्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. या घटनेवर चित्रपटाशी संबंधित लोकांकडून कधीही कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.