बॉलीवूडचा बादशहा अशी ओळख असणाऱ्या शाहरूख खानच्या कारकीर्दीला आज २३ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी शाहरुखचा पहिला चित्रपट ‘दीवाना’ प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘देवदास’ अशा चित्रपटांतून शाहरूखने चित्रपटसृष्टीत ‘किंग ऑफ रोमान्स’ अशी ओळख निर्माण केली. #23GoldenYearsOfSRK हा हॅशटॅग काल मध्यरात्रीपासूनच ट्विटरमध्ये ट्रेडिंगमध्ये आहे. करिअरच्या सुरूवातीलाच ‘बाजीगर’, ‘डर’ अशा चित्रपटांतून शाहरूखने समीक्षकांची वाहवा मिळवली. त्यानंतर ‘करण-अर्जून’, ‘परदेस’, ‘स्वदेश’ आणि ‘वीर-झारा’ या चित्रपटांतूनही त्याने आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवून दाखवले.
kuch-kuch-hota-hai
पहिल्या चित्रपटापासूनच नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या शाहरुखला कधीही चॉकलेट हिरोच्या भूमिका करणे पसंत नव्हते. त्यामुळेच शाहरुखने सुरवातीला डीडीएलजेची ऑफर धुडकावली होती. मात्र नंतर त्याने डीडीएलजेमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली. तोवर ‘दीवाना’, ‘बाजीगर’ आणि ‘डर’ यासारखे त्याचे चित्रपट सुपरहिट झाले होते. तर ‘चमत्कार’ आणि ‘माया मेमसाब’ यांसारखे चित्रपट आपटले होते. मात्र, आदित्यने जेव्हा त्याला सांगितले की, सुपरस्टार होण्यासाठी राज मल्होत्रासारखी एखादी भूमिका करावीच लागेल त्यावेळी शाहरुख ही भूमिका करण्यासाठी तयार झाला. सध्या शाहरूख खान रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून आगामी काळात तो ‘फॅन’ आणि ‘रईस’ या चित्रपटांतूनही मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
baazigar

Story img Loader