बॉलीवूड कलाकार रुपेरी दुनियेत रमलेले असले तरी त्यांना निवडणुकांची जाणीव आहे. तसेच, त्यांनी बदलाव घडवून आणण्यासाठी मतदान करा असे सांगणारे संदेशही दिले आहेत. बी टाउनच्या सेलिब्रेटींनी मतदान आवश्यक असल्याचा आग्रह धरला आहे तर काहींनी आपला भारत कसा असावा याबाबत आपले मत मांडले आहे.
“आपण सगळेजण आनंदी देशात राहू इच्छितो. टीव्हीवर काही गोष्टी पाहून आणि लोकांबाबत वाचल्यामुळे कोणाला मत करावे आणि कोणाला मत करू नये हे प्रत्येकालाच चांगले माहित आहे”, असे शाहरुख खान म्हणाला आहे.
नेत्यांनी केलेली आश्वासने त्यांनी पूर्ण करावीत, अशी इच्छा अभिनेत्री दीपिका पादुकोणने व्यक्त केली आहे. आपल्या राजकारण पद्धतीत बदल व्हावा असं बहुतेकांना वाटत असावं, असे मला वाटते. आपण जेव्हा मत देणार असतो त्यावेळी अनेक आश्वासने आपल्याला दिली जातात. यावेळी त्या आश्वासनांना राजकारणी जागतील असे वाटते. तसेच, जास्तीत जास्त तरुणाईने यंदा मत करावे, असेही दीपिका म्हणाली. ती आयफा पुरस्कार सोहळ्यालाही उपस्थित राहणार आहे. मात्र, एक भारतीय नागरिक असल्यामुळे ती आधी मतदान करणार आणि त्यानंतर आयफासाठी प्रस्थान करणार आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चांगल्या आणि स्वच्छ भारताची अपेक्षा करते. मला भारत भ्रष्टाचारमुक्त हवा आहे. मुख्य मार्गांच्या समस्या आणि वाढणा-या पेट्रोलच्या किंमती याने प्रत्येकजण कंटाळला आहे. मला वाटतं आता बदलाची वेळ आली आहे, असे सोनाक्षी म्हणाली.
“मी मत द्यायला जाणार आहे आणि मत करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. मत दिल्यामुळे योग्य व्यक्तीला सत्तेवर येण्यास मदत होईल. मत न दिल्यास आपल्याला कोणत्याही गोष्टींबद्दल तक्रार करण्याचा अधिकार नाही. मतदान करणे हे आपली जबाबदारीच नाही तर कर्तव्यही आहे,” असे अर्जुन कपूर म्हणाला.
सामाजिक राजकीय चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक प्रकाश झा यांना भारताला आधुनिक गांधीची गरज असल्याचे वाटते. वरुण धवन, सनी देओल, अनुपम खेर आणि अन्य तरूण कलाकारांनीही मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सुपरस्टार आमिरने ‘सत्यमेव जयते २’च्या अखेरच्या भागात मतदानाचे महत्व यावर प्रकाश टाकला होता.

Story img Loader