मकावमधील आयफा सोहळा आटपून मुंबईत ‘मन्नत’वर परतलेल्या शाहरूखने आपल्या घरी आलेल्या नव्या ‘सदस्या’च्या आगमनार्थ बॉलिवूडमधील काही मोजक्याच मित्रमंडळींसमवेत आनंदसोहळा साजरा केला. त्याचवेळी या मुलाच्या जन्माच्या वेळी गर्भलिंग चाचणी करण्यात आली नव्हती, असे सांगत याविषयी निर्माण झालेल्या चर्चानाही पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शाहरूखने केला. या मुलाचे नाव ‘अब्राम’ असे ठेवण्यात आले आहे.
‘आमच्या बाळावरून जो काही गदारोळ सध्या सुरू आहे त्याला सामोरे जात असताना माझ्यासाठी एकच आनंदाची गोष्ट आहे तो म्हणजे आमचा ‘अब्राम’ आता घरी आला आहे. त्याचा जन्म नियोजित प्रसुतीच्या तारखेपूर्वी खूप दिवस आधी झाल्याने आमचा जीव टांगणीला लागला होता. अखेर तो आला आणि आमचे घर आनंदाने उजळून निघाले,’ अशी भावना शाहरूखने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केली .
सरोगसी पध्दतीने जन्माला आलेल्या बाळासाठी कोणत्याही प्रकारची गर्भलिंग चाचणी करण्यात आली नव्हती, असे शाहरूखने स्पष्ट केले आहे. गर्भलिंग चाचणीसंदर्भातील अफवा पसरवण्यात आली त्याच्याही आधी अब्रामचा जन्म झाला होता. बाळाचा जन्म ही माझ्यासाठी अतिशय खासगी बाब होती. त्याच्या जन्माबद्दलचा सगळा तपशीलही जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्यात आल्याचे शाहरूखने म्हटले आहे.