बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान ‘गॉट टॅलेंट वर्ल्ड स्टेज लाईव्ह’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. जेव्हा हे वृत्त प्रसिद्ध झाले, तेव्हा शाहरूख खान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत असल्याचे अनेकांना वाटले. परंतु, हा शो लाईव्ह असल्याचे सांगत शाहरूखने या शोबाबतचे गैरसमज दूर केले. ज्या पद्धतीने तो चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन करतो, त्याच पद्धतीने तो या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. ‘गॉट टॅलेंट वर्ल्ड स्टेज लाईव्ह’ हा शो म्हणजे ‘गॉट टॅलेंट’ नावाच्या प्रसिद्ध शोचा एक भाग असून, या शोचा प्रिमिअर भारतात होत आहे. मुंबईतील अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये ६ डिसेंबरला हा शो पार पडणार आहे. कलर्स वाहिनीवर दाखविण्यात येणाऱ्या या शोमध्ये भारत आणि जगभरातले दहा जण आपल्यातील कलागुणांचा अविष्कार सादर करतील.
“ते हा शो लाईव्ह करीत असून, मला ही कल्पना खूप आवडली… वेगवेगळे कलागुण असलेल्या व्यक्ती आपल्या कलागुणांचे स्टेजवर लाईव्ह प्रदर्शन करतील. काही तासांसाठी मी या शोचे सूत्रसंचालन करणार आहे,” ‘स्लॅम’ या आपल्या वर्ल्ड टूरला रवाना होण्याआधी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना शाहरूख म्हणाला.
‘सिनेयुग’ प्रस्तुत ‘गॉट टेलेंट वर्ल्ड स्टेज लाईव्ह’ शो कलर्स वाहिनीवर दाखविण्यात येणाऱ्या ‘इंडिया गॉट टेलेंट शो’चे विस्तारित रूप आहे. टॅलेंट शोच्या स्वरूपाची निर्मिती आणि मालकी सिमोन कोवेल यांच्या ‘सायको एन्टरटेन्मेंट’ची असून, ‘फ्रेमेंटलमीडिया इंडिया’ हे याचे सह-निर्माते आहेत.

Story img Loader