‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ते अगदी ‘माय नेम इज खान’ चित्रपटापर्यंत शाहरूख खान आणि काजोल ही जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. काजोलने चित्रपट सोडून घरसंसारात मन रमवल्यामुळे पुन्हा ही जोडी पडद्यावर एकत्र दिसण्याची शक्यता दुरापास्त झाली होती. मात्र, या जोडीच्या प्रेमात फक्त त्यांचे चाहते प्रेक्षकच आहेत असे नाही तर आत्ताच्या दिग्दर्शकांपैकीही काही त्यांचे चाहते आहेत. त्यातल्याच एका दिग्दर्शकामुळे शाहरूख आणि काजोल ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येणार असल्याचे समजते.
क रण जोहर, आदित्य चोप्रा आणि फराह खान या तीन दिग्दर्शकांनंतर एकाच दिग्दर्शकाला शाहरूखचे मन जिंकण्यात यश आले आहे तो म्हणजे रोहित शेट्टी. रोहित शेट्टीबरोबर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ केल्यानंतर शाहरुख आणि त्याच्यात चांगलीच गट्टी जमली होती. त्यात या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर तर शाहरूखच्या यादीत रोहितचे नाव सर्वात पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. या दोघांनी पुन्हा एका चित्रपटासाठी करार केला आहे. हा चित्रपट काय असेल, त्याची कथा काय आहे, वगैरे गोष्टी अजून तरी गुलदस्त्यात आहेत.
मात्र, रोहितने ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटादरम्यान मुलाखत देताना सांगितले होते की तो एका वेळी एका चित्रपटावर अडकून बसत नाही. ‘सिंघम’ करत असतानाच ‘सिंघम रिटर्न्स’ची संकल्पना मान्य झाली होती. आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ पूर्ण होईपर्यंत त्याची ‘सिंघम रिटर्न्स’ची पटकथाही तयार झाली होती. आणि ‘सिंघम रिटर्न्स’ पूर्ण करत असतानाच पुढच्या चित्रपटाची पटकथाही लिहून तयार झाली असल्याचे रोहितने सांगितले होते. तर त्याची पटकथा पूर्ण झालेला हा चित्रपट म्हणजे शाहरूखबरोबरचा दुसरा चित्रपट आहे, यात आता शंका उरलेली नाही. याच चित्रपटात शाहरूखची नायिका म्हणून रोहितने काजोलची निवड केल्याचे समजते.
रोहित आणि अजय देवगण हे एकमेकांचे शाळू सोबती आहेत. शिवाय, व्यावसायिकरित्या या जोडीने एकत्र येऊन हिट चित्रपट दिले असल्याने रोहित हा काजोलसाठीही अगदी घरचा माणूस आहे. त्यामुळेच असेल रोहितच्या या चित्रपटासाठी काजोलक डूनही होकार मिळाल्याचे समजते.
मात्र, रोहित किंवा शाहरूख दोघांपैकी कोणीही याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, चित्रपटाचे प्राथमिक काम सुरू झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू होईपर्यंत गोष्टी ठरल्यानुसार पार पडल्या तर नक्कीच शाहरूख आणि काजोल या दोन खंद्या कलाकारांची तितकीच जबरदस्त कलाकृती पुन्हा पहायला मिळेल. शिवाय, त्याला रोहित शेट्टीचा दिग्दर्शकीय स्पर्श असल्याने अशी सुपरहिट संधी कोणीही सोडणार नाही, असे बोलले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा