SRK-FAMILY-300x194सामान्यत: लोकप्रिय पालकांच्या मुलांना समाजात वावरताना फार कठीण जात असल्याचे पाहायला मिळते. परंतु, याबाबतीत सुपरस्टार शाहरूख खानचे मत वेगळे आहे. स्वत:ला लाभलेल्या स्टारडमचा आपल्या मुलांवर कधीही वाईट परिणाम होणार नाही, असे त्याचे ठाम मत आहे. आर्यन, सुहाना आणि अबराम या तीन मुलांचा वडील असलेल्या शाहरूखचे म्हणणे आहे की, सुरवातीला या सगळ्याशी निपटणे माझ्या मुलांना कठीण जायचे. परंतु मी त्यांची जडणघडण अशाप्रकारे केली आहे की आता त्यांच्यावर लोकप्रियतेचा काहीही परिणाम होत नाही. माझ्या स्टारडमचा माझ्या मुलांवर कधीही वाईट परिणाम होणार नाही. मी आणि गौरीने मुलांना कधीच स्टारडमचा हिस्सा बनविले नाही. जीवनात मी खूप संघर्ष आणि मेहनत करत असल्याची जाणीव आम्ही दोघांनी आमच्या मुलांना करून दिली आहे. सुरुवातीच्या काळात आर्यन आणि सुहानाबरोबर जेव्हा मी त्यांच्या शाळेत जायचो, तेव्हा त्यांना विचित्र वाटायचे. कारण अन्य पालकांना रमेशचे वडील किंवा गीताचे वडील असे संबोधले जायचे, तर मला शाहरूख खान म्हणून हाका मारल्या जायच्या. माझ्या मुलीला याचे वाईट वाटायचे, परंतु तिने कधीही मला लाज वाटेल असे वर्तन केले नाही. आपल्या मुलांविषयी बोलताना शाहरूख म्हणाला, माझे चित्रपट पाहण्याची मुलांना सक्ती करण्यात येत नसून, त्यांना चित्रपटाच्या कमाई विषयीदेखील माहिती नसते. माझा मुलगा आर्यन कधीही मी करत असलेल्या शोच्या अथवा चित्रीकरणाच्या ठिकाणी येत नाही. माझ्या मुलांचे संगोपन अशाप्रकारे करण्यात आले आहे की, घराच्या बाहेर मी जे काही आहे, त्याविषयी जाणणे त्यांच्यासाठी गरजेचे नाही. येत्या २४ ऑक्टोबरला दिवाळीदरम्यान शाहरूखचा ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटात दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सुद आणि विवना शहा यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.
(छाया : वरिंदर चावला)

Story img Loader