“एकमेव शाहरूखच मला रडवू शकतो!”, असं म्हणणं आहे ‘दिल से’, ‘वीर झारा’ आणि ‘कल हो ना हो’सारख्या चित्रपटांमधून शाहरूख खानची सहअभिनेत्री राहिलेल्या प्रिती झिंटाचं. भावनात्मक आणि रोमान्सची दृश्ये मोठ्या पडद्यावर उत्तमरित्या साकारण्यात शाहरूखचा हातखंडा आहे. शाहरूख या एकमेव अभिनेत्याबरोबर अनेक दृश्यांमधून आपल्याला अश्रू काढावे लागल्याचं प्रितीनं टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये सतरा वर्षाचा कालखंड पूर्ण करणाऱ्या प्रिती झिंटानं टि्वटरवरील चाहत्यांबरोबरच्या प्रश्नोत्तरांमध्ये आपल्या सहकलाकारांविषयी मनोगत व्यक्त केलं आहे. सलमान खानबरोबर पहिल्यांदा अभिनय करण्यापूर्वी त्याच्याविषयी प्रचंड भीती वाटत असल्याचा अनुभव कथन करताना तशी भीती त्यावेळी का वाटत होती हे नक्की सांगता येत नसल्याचं तिनं म्हटलं आहे. ‘दिल चाहता हैं’ चित्रपटादरम्यान आमीर खाननं आपल्याबरोबर खूप खोडकरपणा केल्याचंदेखील तिनं म्हटलं आहे. चित्रपटाच्या शुटिंगसाठी जाताना बसमधील प्रवासात तोंड उघडं ठेऊन झोपली असताना आपल्या तोंडात पाणी ओतून आमीरने खोडी काढल्याचा अनुभव तिनं कथन केला. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटातील सह-अभिनेत्री राणी मुखर्जीबरोबर आपलं छान जुळत असून, ती आपली सर्वात चांगली आणि जवळची सह-कलाकार असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे ‘संघर्ष’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पायाच्या दुखापतीचा दुःखद अनुभवदेखील तिनं चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

Story img Loader