बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या कारकिर्दीत आणखी एक मोठी कामगिरी जोडली जाणार आहे. आतापर्यंत शाहरुखने ‘मेट गाला’मध्ये भाग घेतलेला नाही; परंतु २०२५ मध्ये हा इतिहास बदलणार आहे.
यावेळी फॅशनच्या जगतातील सर्वांत मोठ्या इव्हेंटपैकी एक असलेल्या ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर शाहरुख दिसणार आहे. ही बातमी फॅशन वॉचडॉग ‘डाएट सब्या’नं त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे, ज्यावर चाहते प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
शाहरुख दिसणार मेट गालाच्या रेड कार्पेटवर…
शाहरुख खानकडून अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण ‘डाएट सब्या’नं शेअर केलेली ही बातमी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने लाईक केली आहे, त्यामुळे ही बातमी बऱ्याच अंशी खरी मानली जात आहे. आता सर्वांच्या नजरा शाहरुखच्या ऑफिशियल स्टेटमेंटवर खिळल्या आहेत.
‘डाएट सब्या’च्या वृत्तानुसार, या खास प्रसंगी शाहरुख खान प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या आउटफिटमध्ये दिसणार आहे. शाहरुख आणि सब्यसाचीची ही जोडी मेट गालाच्या रेड कार्पेटवर भारतीय फॅशनचा एक नवा इतिहास रचू शकते. शाहरुखच्या स्टाईलनं नेहमीच लोकांची मनं जिंकली आहेत आणि यावेळीही त्याच्याकडून काहीतरी खास अपेक्षित आहे. ५ मे रोजी ‘मेट गाला २०२५’ न्यू यॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे आयोजित केला जाईल, जिथे जगभरातील आघाडीचे फॅशन आयकॉन उपस्थित राहतील.
कियारा अडवाणीदेखील मेट गालामध्ये करणार पदार्पण…
शाहरुखसोबतच यावेळी आणखी एक भारतीय स्टार मेट गालामध्ये प्रवेश करणार आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील या वर्षी मेट गालामध्ये पदार्पण करणार आहे. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा व आलिया भट्ट यांच्यानंतर मेट गालाला उपस्थित राहणारी ती चौथी भारतीय अभिनेत्री असेल. अलीकडेच, कियारानं तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिच्या गरोदरपणाची आनंदाची बातमी शेअर केली आणि आता ती तिच्या मेट गाला पदार्पणाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवत आहे.
५ मे रोजी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट कार्यक्रमाची थीम या वर्षी ‘सुपरफाईन : टेलरिंग ब्लॅक स्टाईल’ आहे, जी मोनिका एल. मिलर यांच्या स्लेव्हज टू फॅशन : ब्लॅक डँडिझम अँड द स्टायलिंग ऑफ ब्लॅक डायस्पोरिक आयडेंटिटी या पुस्तकापासून प्रेरित आहे. या वर्षीचा ड्रेस कोड ‘टेलर्ड टू यू’ आहे.