अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी दिवसोंदिवस वाढत चालल्याचं चित्र दिसत आहे. आज पुन्हा एकदा मुंबईमधील विशेष न्यायालयाने आर्यनला जामीन नाकारला. आर्यन खानबरोबरच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आलेत. मात्र या प्रकरणामध्ये आता शाहरुखचा बॉलिवूड सेलिब्रिटींकडून मिळणारा पाठिंबा वाढताना दिसत आहे. आर्यनला आजही जामीन नाकारण्यात आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केलीय.
स्वयंघोषित चित्रपट विश्लेषक असणाऱ्या कमाल आर खानने आर्यनला जामीन नाकारण्यात आल्यानंतर एक ट्विट केलं आहे. “आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. हा आता पूर्णपणे छळ करण्याचा प्रकार वाटू लागलाय. ज्या व्यक्तीकडे अंमली पदार्थ सापडले नाही किंवा तो अंमली पदार्थ सेवन करताना त्याला अटक झाली नाही अशा व्यक्तीला कसं काय २० दिवस तुरुंगामध्ये ठेवलं जाऊ शकतं?”, असा प्रश्न कमाल आर खानने विचारला आहे. तसेच पुढे बोलताना त्याने कॉमेडियन भारती सिंह प्रकरणाची आठवण करुन दिली आहे. “दुसरीकडे भारती सिंहला त्याच दिवशी जामीन देण्यात आलेला ज्या दिवशी तिच्याकडे ८६ ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आलेले. हे म्हणजे असं झालं की दोन वेगवेगळ्या व्यक्तींसाठी दोन वेगवेगळे कायदे,” असं केआरके म्हणालाय.
अभिनेत्री मिरा चोप्राने हार्ट ब्रेकिंग असं म्हणत ट्विट केलं आहे.
तसेच तेहसीन पूनावालानेही ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केलीय. “आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. हा फार अन्याय आणि छळवणूक आहे. आर्यनने मुंबई उच्च न्यायालयात गेलं पाहिजे. जामीन म्हणजे तुरुंगवास नसून एखादी व्यक्ती निर्दोष किंवा दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत दिला जाणारा दिलासा आहे,” असं पूनावालाने ट्विटमध्ये म्हटलंय.
सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये असणाऱ्या आर्यन खानला न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. आर्यन हा ३ ऑक्टोबरपासून तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. २ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.