शाहरूख खानचे अभिनय, माधुरीची ‘मार डाला’ गाण्यातील दिलखेचक अदाकारी, ऐश्वर्या राय बच्चनचे अप्रितम सौंदर्य आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा स्पेशल टच या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असा ‘देवदास’ चित्रपट २००२ मध्ये खूप गाजला. येत्या १२ जुलैला या चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भन्साळी यांनी ‘देवदास’ एका नवीन रुपात प्रेक्षकांसमोर आणण्याचे ठरविले आहे. हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.
‘मुळात या चित्रपटातील प्रत्येक फ्रेमसाठी अत्यंत बारकाईने काम केलेलं. यातील प्रत्येक दृष्य एका कलाकाराने साकारलेल्या अप्रतिम कलेप्रमाणे आहे. त्यामुळे थ्रीडी व्हर्जनसाठी हा चित्रपट अतिशय योग्य आहे,’ असं संजय लीला भन्साळी म्हणाले. शाहरूख, माधुरी आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. या चित्रपटातील प्रत्येक दृष्य आता आणखी उच्च दर्जात पाहायला मिळणार आहे.
वाचा : ऐश्वर्याची मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा
‘देवदास’मध्ये शाहरूखची प्रेमकथा दर्शवली आहे ज्यात त्याची प्रेयसी दुसऱ्यासोबत लग्न करते. देवदास मुखर्जीची भूमिका साकारलेल्या शाहरूखचा चित्रपटाअखेर प्रेयसीच्या घराबाहेर मृत्यू होतो. पारोची भूमिका साकारलेल्या ऐश्वर्याचे अभिनय कौशल्य आणि अप्रतिम सौंदर्याची प्रचिती या चित्रपटात येते. तर चंद्रमुखीची भूमिका साकारलेल्या माधुरीने अनोखी नृत्यशैली आणि दिलखेचक अदाकारीने सर्वांची मने जिंकली.
जाणून घ्या, काय आहे अक्षयचे ‘टॉयलेट एक रेव्होल्युशन’
चित्रपटात भव्यदिव्य महाल, व्यक्तिरेखांचा पोशाख, दागदागिने या सर्वांचा एक वेगळाच थाट आपल्याला पाहायला मिळतो. सर्वोत्तम सेट, भव्य आणि आकर्षक रचना हे संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्यच आहे. सध्या भन्साळी ‘पद्मावती’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ‘पद्मावती’मध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर मुख्य भूमिका साकारणार असून नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.