बॉलिवूडचा किंग खान अशी अभिनेता शाहरुख खानची ओळख सांगितली जाते. शाहरुख खान हा आपल्या रोमँटिक भूमिकांमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो आपल्या मिश्किल स्वभावामुळे देखील आहे. कौन बनेगा करोडपती असो किंवा फिल्मी पुरस्कार सोहळे असो आपल्या खुमासदार शैलीत तो सूत्रसंचालन करत असतो. अनेक मुलाखतींमध्ये तो इतर कलाकारांवर तोंडसुख घेत असतो. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची मस्करी केली होती.
शाहरुख खान नेमकं काय म्हणाला?
मुंबई पोलिसांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी उमंग हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरील सर्वच कलाकार सहभागी होत असतात. विशेष म्हणजे ते या कार्यक्रमात कलाविष्कारही दाखवत असतात. शाहरुख खानने नुकतंच उमंग २०२२ च्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतानाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीलाच हर्ष म्हणतो, या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी येऊन गेले आहेत. पण माझी नजर पोलीस आयुक्त सरांवरुन हटत नाही. मुंबईसारख्या शहराचे आयुक्त होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यावर शाहरुख खानने फार मजेशीररित्या उत्तर दिले होते.
विश्लेषण: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक का झाली?
‘मुंबईसारख्या शहराचे आयुक्त होणे ही केवळ एखाद्या शहरासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. जरी सगळ्यांना त्यांचे ऐकावे लागत असेल तरी एका व्यक्तीसमोर येस बॉस येस बॉस असेच म्हणावे लागते. मुंबई पोलीस आयुक्तांनाही झुकावे लागते ती व्यक्ती म्हणजे पत्नी’, असे शाहरुखने म्हटले. त्याचे हे वक्तव्य ऐकताच सर्व प्रेक्षक खळखळून हसताना दिसत आहे.
दरम्यान बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. याप्रकरणी संजय पांडे यांना दिल्ली न्यायालयाने नऊ दिवसांची ईडी कोठडीही सुनावण्यात आली होती. मंगळवार १९ जुलै रोजी ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले होते.
अटकेमागील कारण काय?
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) सर्व्हरमध्ये फेरफार करत तत्कालीन मुख्य व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांनी माजी समूह कार्य अधिकारी आनंद सुब्रमणियन यांच्याशी संगनमत करून शेअर बाजाराच्या यादीत असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला. त्याद्वारे स्वत:चा कोट्यवधी रुपयांचा फायदा करून घेतला, असे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात समोर आले आहे. हा गैरव्यवहार सुरू असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संजय पांडे यांनी स्थापन केलेली आयसेक प्रा. लि.या कंपनीने एनएसई अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केले, ही माहिती चित्रा रामकृष्ण यांना पुरविली. या मोबदल्यात पांडे यांच्या कंपनीला ४.५ कोटी रुपये बिदागी मिळाली. पांडे यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करुन काळा पैसे कमावला. तसेच या फोनटॅपिंगमागील हेतू काय होता, याची माहिती घेतानाच पांडे आणि रामकृष्णन यांची समोरासमोर चौकशी करायची आहे, असे स्पष्ट करीत सक्त वसुली संचालनालयाने त्यांना अटक केली.