फिफा विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात थरारक फायनलपैकी एक ठरलेल्या रविवारच्या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनी अर्जेंटिनाचं जगज्जेते बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं. तसेच मेस्सीच्या चाहत्यांचं त्याला विश्वचषक जिंकताना पाहण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. आधी एकतर्फी झालेल्या या सामन्यात फ्रान्सने कमबॅक केलं आणि लढत चुरशीची झाली. पण, अखेर पॅनल्टी शूट आऊटमध्ये अर्जेंटिनानं फ्रान्सला नमवत विश्वचषकावर नाव कोरलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जेंटिना जिंकल्यानंतर जगभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं विशेष लक्ष होतं, कारण हा फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा अखेरचा विश्व चषक होता. या सामन्यानंतर तो निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जातंय. अर्जेंटिनाच्या संघावर जगभरातून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला जातोय. शाहरुख खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हा विश्व चषक पाहिला आणि जल्लोष केला. शाहरुखने तर या सामन्यानंतर एक भावनिक पोस्टदेखील लिहिली आहे.

शाहरुखने लिहिले, “आम्ही आतापर्यंतच्या सर्वोत्तम विश्वचषक फायनलच्या काळात जगत आहोत. मी माझ्या आईबरोबर एका छोट्या टीव्हीवर विश्वचषक पाहिल्याचं आठवतंय….आता माझ्या मुलांबरोबर फायनल बघतानाही तोच उत्साह होता!! आम्हा सर्वांना प्रतिभा, कठोर परिश्रम आणि स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावल्याबद्दल मेस्सी तुझे खूप आभार!!” असं शाहरुखने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

याशिवाय अभिनेता रणवीर सिंगनेही ट्वीट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. रणवीर सिंगने ट्वीट केलं. “मी आता काय पाहिलं?!?! ऐतिहासिक, आयकॉनिक आणि नुसती जादू. #FIFAWorldCup…” असं कॅप्शन त्याने दिलं होतं.

दरम्यान, अर्जेटिनाचा कर्णधार आणि फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अखेर साकार झालं. रविवारी झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर ४-२ अशी सरशी साधत अर्जेटिनाने तिसऱ्यांदा विश्वविजेते म्हणून मिरवण्याचा मान मिळवला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan thanks lionel messi after argentina wins fifa world cup hrc