बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान हा गेले एक आठवडा खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असून आज मुंबईत त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शाहरूखचा मुलगा आर्यन हा लंडनमधील सेवोनोक्स शाळेत शिकत असून तो देखिल लंडनहून शस्त्रक्रियेसाठी भारतात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वी शाहरूख हा लंडनमध्येच शस्त्रक्रियेसाठी जाणार होता मात्र त्याने अचानक ही शस्त्रक्रिया मुंबईतच करण्याचे ठरविले.
सध्या शाहरूख रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे लंडनला जाऊन शस्त्रक्रिया करणे, त्यातून बरा होणे आणि पुन्हा भारतात परत येणे यामध्ये बराच वेळ वाया जाण्याची शक्यता असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे.
खरंतर शाहरूखच्या मांसाला दुखापत झाली आहे. मात्र, अॅक्शन सीन आणि डान्समुळे ही दुखापत वाढली. दोन वर्षापूर्वी शाहरूख खानवर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रूग्णालयात याच खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. लीलावती रूग्णालयातील डॉ. संजय देसाई हे शाहरूखवर शस्त्रक्रिया करणार आहेत.   

Story img Loader