बॉलीवूडचा किंग शाहरुख खानप्रमाणे त्याची पत्नी गौरी खानही नेहमीच चर्चेत असते. गौरी खानचा चाहता वर्गही मोठा आहे. गौरी प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर गौरीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच गौरीने तिचा नवीन व्यवसाय सुरू केला. मुंबईत तिने स्वत:चे रेस्टॉरंट उघडले आहे.
मुंबईतील बांद्राच्या पाली हिल या भागात गौरीने नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. टोरी असे तिच्या नव्या रेस्टॉरंटचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच गौरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या रेस्टॉरंटची झलकही दाखवली होती. आता गौरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रेस्टॉरंटच्या आतील परिसर बघायला मिळत आहे.
गौरीच्या नव्या रेस्टॉरंटची सजावट लाल, हिरव्या व सोनेरी रंगात करण्यात आली आहे. रेस्टॉरंटमध्ये अनेक ठिकाणी हिरवीगार झाडे लावण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी झाडांच्या मोठ्या कुंड्या ठेवलेल्या दिसून येत आहेत. गौरीचे हे नवीन रेस्टॉरंट खूपच भव्य आणि सुंदर आहे.
दरम्यान, गौरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत रेस्टॉरंटच्या नावाचा अर्थही सांगितला होता. ती म्हणाली, “टोरी म्हणजे मंदिराचे प्रवेशद्वार. आमच्यासाठी हे रेस्टॉरंट यापेक्षाही जास्त आहे. रेस्टॉरंटमध्ये उबदार आणि आलिशान वातावरणनिर्मिती करण्यासाठी येथील प्रत्येक वस्तू विचार करून निवडण्यात आली आहे. रेस्टॉरंटच्या आतील भागात लाल, हिरवा व सोनरी रंगाचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून येथे एक हवेशीर आणि आरामदायक वातावरण तयार होईल.”
हेही वाचा- ट्विंकल खन्नाच्या ‘त्या’ विधानावर कंगना रणौतचे खडेबोल; म्हणाली, “पुरुषांना प्लास्टिकची बॅग…”
इंटीरियर डिझायनिंग व रेस्टॉरंटशिवाय गौरी अनेक व्यवसायांची मालकिण आहे. ती एक चित्रपट निर्मातादेखील आहे. गौरी व शाहरुखने मिळून रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. या प्रोडक्शन अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.