बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ऑस्कर विजेत्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर दुसरीकडे ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच आता चित्रपटाशी निगडीत एक मोठा खुलासा आमिर खानने केला आहे. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान देखील या चित्रपटात दिसणार असल्याचे आमिरने सांगितले.

आमिर खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खान देखील ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये झळकणार असल्याचे सांगितले. शाहरुख खान पाहुणा कलाकार म्हणून चित्रपटात दिसणार आहे. याबाबत आमिरने सांगितले, “मी आणि शाहरुख खान चांगले मित्र आहोत. त्याला या भूमिकेसाठी विचारलं, तेव्हा त्याला सांगितल की मला भारतातील आयकॉनिक स्टार हवा आहे. म्हणून मी याबाबत तुझा विचार करत आहे.” यानंतर शाहरुखने यासाठी होकार दिल्याचे आमिरने सांगितले.

आणखी वाचा – “तू लेखक नाहीस” म्हणत आमिर खानने दिला होता अतुल कुलकर्णींच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला नकार

दरम्यान चित्रपटाचे निर्माते किंवा स्वतः शाहरुख खानने अजुनही याबाबत कोणताही खुलासा केला नाही. शाहरुख खान सध्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शाहरुख खानसोबत तापसी पन्नू या चित्रपटात दिसणार आहे. ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय शाहरुख खान ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या भूमिकेबद्दल वैयक्तिकरित्या काय वाटतं? आमिर खान म्हणाला “आपल्यातील सर्व चांगुलपणा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातील आमिर खानच्या लुकची विशेष चर्चा होत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पण त्याच दिवशी अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक यातील कोणत्या चित्रपटाला पसंती देणार, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.