राज्यातील भाजपच्या पहिल्यावहिल्या सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी मुंबईतील वानखेडे मैदानावर होतो आहे. या सोहळ्यासाठी कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय या क्षेत्रातील दिग्गजांसोबतच बॉलीवूडमधील कलाकारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अभिनेता शाहरुख खान याला शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे मैदानावर प्रवेश दिला जाणार का, अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. वानखेडे मैदानाची मालकी ज्या मुंबई क्रिकेट मंडळाकडे आहे, त्यांनी २०१२ साली या मैदान परिसरात प्रवेश करण्यास शाहरुख खानला बंदी घातली आहे. आता बंदी असताना राज्यातील नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी शाहरूख खान तिथे येणार का आणि तो आला तर त्याला मैदानावर जाण्यास एमसीए परवानगी देणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपचे विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता वानखेडे मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचेच सात ते आठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती मिळाली आहे. राज्यात पहिल्यांदाच भाजपला एकहाती सत्ता मिळत असल्याने मोठ्या दिमाखात शपथविधी सोहळा करण्याचे पक्षाने ठरविले आहे. त्यासाठी वानखेडे मैदान एक दिवसासाठी भाड्याने घेण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, विविध राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री, कॉर्पोरेट जगतातील दिग्गज मंडळी यांच्यासोबत बॉलिवूडमधील कलाकारांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. शाहरूख खान यालाही भाजपकडून शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे. मात्र, वानखेडे परिसरात प्रवेश देण्यास एमसीएने शाहरूख खानला बंदी घातली आहे.
२०१२ सालच्या इंडियन प्रिमिअर लीगच्या अंतिम सामन्यानंतर मैदानावर उतरलेल्या शाहरूख खानला तेथील सुरक्षारक्षकाने अडविले होते. आयपीएलचा सामना संपल्यानंतर मैदानातून बाहेर जाण्यास सुरक्षारक्षकांनी त्याला सांगितले. मात्र, यावेळी शाहरूख खान आणि त्याला थांबविणाऱ्या सुरक्षारक्षकामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. त्यावेळी शाहरूखने सदर सुरक्षारक्षकास धक्कबुक्कीदेखील केली. त्यानंतर शाहरूख खानच्या या गैरवर्तनाबद्दल शिक्षा म्हणून मुंबई क्रिकेट मंडळाकडून त्याच्यावर वानखेडे मैदानावर प्रवेशासाठी ५ वर्षाची बंदी घालण्यात आली. ही बंदी अद्याप लागू आहे. त्यामुळे कोणत्याही क्रिकेट सामन्यांसाठी शाहरूख या मैदानावर जाऊ शकत नाही. आता शपथविधीसाठी त्याला मैदानावर सोडले जाणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा