बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे शाहरुख चर्चेत असतो. फक्त शाहरुख नाही तर शाहरुख राहत असलेला मन्नत हा बंगला ही मुंबईतील लोकप्रिय स्थळांपैकी एक आहे.
गेल्या काही दिवसांपासून शाहरुखचा बंगला मन्नत सोशल मीडियावर ट्रेण्ड करत होता. याचं कारणही खास होतं. काही दिवसांपूर्वी शाहरुखने त्याच्या बंगल्यावर नावाची नवीन पाटी बसवली आहे. शाहरुखच्या घराबाहेर नेहमीच चाहत्यांची गर्दी असते. त्यावेळी काही चाहत्यांच्या लक्षात आलं होतं की शाहरुखने त्याच्या घराच्या नावाची पाटी नवीन बसवली, पण आता हेच चाहते शाहरुखच्या बंगल्याच्या समोरून निराश होऊन परत येत आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मन्नतच्या या महागड्या नेमप्लेटवरून एक डायमन्ड खाली पडल्यामुळे नेमप्लेट दुरुस्ती करण्यासाठी काढण्यात आली आहे. मन्नत’ नेमप्लेट शाहरुखच्य घरात असून दुरूस्त झाल्यावर पुन्हा लावण्यात येणार आहे.
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
शाहरुखच्या घरा समोर असलेल्या या नावाच्या पाटीची डिझाइन त्याची पत्नी गौरी खानने केली आहे. गौरीच्या टीमने मिळून ही नावाची पाटी बनवली आहे. मात्र, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नावाच्या प्लेटची किंमत आहे. मन्नतच्या नेम प्लेटची किंमत ही सुमारे २० ते २५ लाख रुपये आहे.
दरम्यान, शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने ‘झिरो’ चित्रपटात अखेरचं काम केलं होतं. यात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. लवकरच तो सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. याशिवाय नयनतारा आणि सान्या मल्होत्रासोबतही त्याचा एक चित्रपट लवकरच येणार आहे.