लोकप्रिय टीव्ही अभिनेता शाहीर शेखवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शाहीरचे वडिल शाहनवाझ शेख यांचं निधन झालं आहे. शाहीरनं काही दिवासांपूर्वीच ट्विटरवरून त्याच्या वडिलांना करोनामुळे गंभीर इन्फेक्शन झाल्याची माहिती दिली होती. त्यांची प्रकृती गंभीर होती त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी शाहीरनं त्याच्या वडिलांसाठी प्रार्थना करण्याची चाहत्यांना विनंती केली होती.
शाहीरच्या वडिलांचं बुधवारी रात्री निधन झालं. शाहीरचा जवळचा मित्र आणि अभिनेता अली गोनीनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. शाहीरला आपल्या ट्वीटमध्ये टॅग करत अलीनं लिहिलं, ‘अल्लाह तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती देवो’
अली गोनीच्या या ट्वीटनंतर शाहीरचे चाहते देखील शाहीरचं सांत्वन करताना दिसत आहेत. त्याच्या वडिलांसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. दरम्यान १८ जानेवारीला रात्री शाहीरनं एक ट्वीट केलं होतं ज्यात त्यानं लिहिलं होतं, ‘माझे वडील व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना करोनामुळे गंभीर इन्फेक्शन झालं आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा.’
शाहीर शेखच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेत त्यानं अर्जुनची भूमिका साकारली होती. ज्याचं बरंच कौतुक झालं होतं. तो शेवटचा ‘पवित्र रिश्ता’मध्ये मानवची भूमिका साकारताना दिसला होता. आगामी काळात तो या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.