हेमंतकुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘नींद ना मुझको आए दिल मेरा घबराए’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. रसिकांच्या ओठावर असलेले हे गाणे आता बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा नव्याने पाहायला मिळणार आहे. शाहीद कपूर व आलिया भट्ट यांच्या आगामी ‘शानदार’ या चित्रपटात हे गाणे या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे. ‘शानदार’ चित्रपटात हे गाणे रिमिक्स स्वरूपात सादर करण्यात आले आहे.
‘पोस्ट बॉक्स नंबर ९९९’ चित्रपटातील या गाण्याची गोडी इतक्या वर्षांनंतरही कमी झालेली नाही. आत्ताच्या काळात बॉलीवूडच्या चित्रपटात हे गाणे पुन्हा घेण्यात आले आहे. या गाण्याचे गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार मदनमोहन आहेत. सुनील दत्त आणि शकिला यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे नव्या पिढीतील शाहीद कपूर आणि आलिया भट्ट सादर करणार आहेत.
‘शानदार’ चित्रपटात शाहीद आणि आलिया यांना निद्रानाशाचा विकार असल्याचे दाखविण्यात आले असून त्या पाश्र्वभूमीवर नींद ना मुझको आए’ हे गाणे या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे. त्यामुळे या गाण्याचे प्रकाशनही नुकतेच मुंबईत एका कॉफी शॉपमध्ये रात्रीच्या वेळेस करण्यात आले. आणि कॉफी पिता पिता शाहीद व आलिया यांनी ‘नींद ना मुझको आए’ म्हणत त्याचे प्रकाशन केले.
चित्रपटातील गाण्यांचे खास वैशिष्टय़ म्हणजे या सर्व गाण्यांचे चित्रीकरण रात्रीच्या वेळेस करण्यात आले आहे. चित्रपटात ‘नींद ना मुझको आए’सह ‘गुलाबो’, शाम शानदार’ ही अन्य गाणी आहेत. ही तीनही गाणी ‘यु टय़ूब’वर पाहायला मि़ळत आहेत. ‘शानदार’चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले असून ते सिद्धार्थ बसरुर व सबा आझाद यांनी गायले आहे. अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट २२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
=-=-=

Story img Loader