माधुरी दीक्षितने आपले नाव ‘झलक दिखला जा’ शोमधून मागे घेल्यावर तिच्या जागी कोण, याबद्दल बरीच चर्चा चालू होती. त्याऐवजी शिल्पा शेट्टीचे नावही पुढे आले होते. पण माधुरीच्या जागी परीक्षकपदी शाहीद कपूरची वर्षी लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूड मंडळी टीव्हीवर येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी रिअॅलिटी शोजची सोप्पी आणि हमखास यश देणारी वाट निवडायला ते पसंती देत आहेत. नव्या फळीतील प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांच्यानंतर शाहीदही आता एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोनिमित्त शाहिदचे टीव्हीवर पदार्पण होणार आहे. विशेष म्हणजे या शोच्या चित्रीकरणापूर्वी शाहीदचे लग्नही उरकलेले असेल. त्यामुळे लग्नानंतर शाहीद त्याच्या छोटय़ा पडद्यावरील कारकीर्दीसाठी सज्ज होईल.
शाहिद कपूरचे लग्न ठरल्याच्या बातमीने संपूर्ण बॉलीवूडला थक्क केले. दिल्लीच्या उद्योजकाची मुलगी मीरा राजपूतशी त्याचे लग्न ठरले आहे. त्यांच्या लग्नाच्या तारखेवरूनही अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. या चर्चा इतक्या वाढल्या की, मध्यंतरी एका अॅवॉर्ड शोमध्ये बोलताना शाहीदने ‘सध्या माझ्या लग्नाबद्दल बाहेर इतक्या चर्चा चालू आहेत की, लोकांना त्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे असे वाटू लागले आहे,’ असे गमतीत म्हटले. कपूर कुटुंबीयांकडूनही लग्नाबाबतीत गुप्तता बाळगली गेली. अगदी लग्नापूर्वी मीराचे कोणतेही छायाचित्र किंवा तिच्याविषयी कोणतीही माहिती लोकांना मिळू नये याची पूर्ण दक्षता घेतली गेली. यासाठी तिचे सोशल मीडियावरील खातेही बंद केले. येत्या जुलै महिन्यात दिल्लीमध्ये हे लग्न होणार आहे. तारखेबद्दल अजूनही निश्चिती नसली तरी १० जुलै ही तारीख सांगितली जात आहे.
दरम्यान ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ शोच्या यंदाच्या पर्वामधून माधुरी दीक्षितने माघार घेतल्यानंतर तिच्या जागेवर शिल्पा शेट्टीपासून अनेक बॉलीवूड नटय़ांची नावे सुचवली गेली. यंदा शाहीद माधुरीच्या जागी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक करण जोहरचे यंदाही या शोचे परीक्षण करणार असून नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाने मात्र आपले नाव शोमधून काढून घेतले आहे. त्याच्या जागी गणेश हेगडेचे नाव निश्चित केले गेल्याचे सांगितले जात आहे. या शोचे चित्रीकरण जुलै महिन्यापासून होणार आहे. शाहीद त्याच्या नृत्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या आगमनाकडे सर्वाचे लक्ष आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून मीराच्या नावापुढे असलेले वलय पाहता, या शोवर तीही शाहिदला सोबत करायला येईल, अशी आशा करायला हरकत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा