बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे लवकरच ‘लाइगर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीपासूनच अनन्याचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच अनेकदा सोशल मीडियावर ती चर्चेत असते. आताही असंच काहीसं घडलं आहे. अनन्यानं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. विशेषतः अभिनेता शाहिद कपूरनं तिच्या या फोटोवर केलेली कमेंट चर्चेत आली आहे.
अनन्या पांडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्या डोक्यावर एक मोठी हॅट दिसत आहे. अनन्याचा हा कूल लुक सर्वांच्याच पसंतीस पडत आहे. पण यासोबतच या फोटोंना तिने दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. फोटो शेअर करताना अनन्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘hatters gonna hat’ या कॅप्शनमध्ये तिनं मजेदार अंदाजात टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
अनन्याच्या या फोटोंना आतापर्यंत १ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. याशिवाय या फोटोंवर कमेंट्सचाही पाऊस पडताना दिसत आहे. अशात अभिनेता शाहिद कपूरलाही अनन्याच्या फोटोवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखता आलेलं नाही. त्यानं तिच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘…आणि पोज देणारे पोज देत राहणार.’ शाहिदची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान मागच्या काही काळापासून अनन्याचं नाव शाहिद कपूरचा लहान भाऊ इशान खट्टरशी जोडलं जात आहे. दोघंही अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. अलिकडेच या दोघांना मुंबई एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं होतं. अनन्याच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात ‘गहराइयां’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अभिनेता विजय देवरकोंडासोबत ती ‘लाइगर’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत असणार आहे.