शाहिद टक्कल करण्याविषयीच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध होताच, त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आणि त्यांनी शाहिदला टक्कल न करण्याची विनंती केली. असे असले तरी, अखेर शाहिदने आपल्या डोक्यावरील केसांना तिलांजली देत टक्कल केले. ‘हैदर’ या आगामी चित्रपटात तो साकारत असलेल्या भूमिकेची गरज म्हणून त्याने हा धाडसी निर्णय घेत डोक्यावरील सर्व केस काढले. सध्या या चित्रपटाचे काश्मिरमध्ये शुटिंग सुरू असून, बुधवारी संध्याकाळी श्रीनगरमधील ‘दल गेट’ येथील एका प्रसिद्ध केशकर्तनालयात त्याने डोक्यावरील सर्व केस काढले. ‘फैजल हेअर ड्रेसर’ नावाच्या या केशकर्तनालया याआधी संजय दत्त, जिमी शेरगील आणि अजय देवगण सारख्या अनेक सेलिब्रिटींनी भेट दिली आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, शाहिद कपूरच्या या नव्या रुपड्याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात येत असून, तो सतत डोक्यावर टोपी घालून वावरताना दिसतो. बाहेर पडताना चेहऱ्याच्या भोवती मफलर गुंडाळून बाहेर पडत असल्याने चाह्त्यांना त्याचे छायाचित्र काढण्यात देखील अडचण येत आहे. शाहिदच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते निराश झाले असून, त्यांनी टि्वटरवर #DontGoBaldShahid हा ट्रेण्डदेखील सुरू केला आहे. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’वर आधारित विशाल भारद्वाजच्या या चित्रपटात शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader