अभिनेता शाहीद कपूर याने आपल्या आगामी चित्रपटासाठी ‘अंदाज अपना अपना’ असे म्हणत एका चेहऱ्यावर अनेक मुखवटे लावून पाहिले आहेत. चित्रपटातील भूमिकेसाठी शाहीदने एक किंवा दोन नव्हे तर चक्क १५ वेगवेगळ्या ‘लुक्स’मध्ये आपण कसे दिसतो ते पाहिले आहे.
शाहीद कपूरच्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी शाहीदने वेगवेगळ्या अंदाजात स्वत:ला सादर करून पाहिले आहे. यासाठी त्याने रंगभूषाकार आणि वेशभूषाकाराची मदत घेतली. भूमिकेसाठी नेमका कोणता ‘लुक’ नक्की झाला, ते मात्र अद्याप जाहीर झालेले नाही.
बॉलिवूडमधील कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्या खास ‘लुक्स’साठी अत्यंत जागरूक असतात. चित्रपटातील विशिष्ट भूमिकेसाठी निर्माता किंवा दिग्दर्शक यांना त्या कलाकाराचा विशिष्ट ‘लुक’हवा असतो. त्या कलाकाराला त्या खास ‘लुक’मध्येच प्रेक्षकांसमोर सादर करायचे असते. अभिषेक चौबे याच्या ‘उडता पंजाब’ चित्रपटासाठी शाहीदने तोच प्रकार केला आहे. अभिषेकच्या सांगण्यानुसार शाहीदने स्वत:ला वेगवेगळ्या ‘लुक्स’मध्ये सादर करून पाहिले.
शाहीदने यासाठी कधी पोनिटेल ठेवून पाहिले तर कधी केसांची रचना सरळ ठेवली, दाढी ठेवून पाहिली, तर कधी केसांना रंगही लावून पाहिला. सध्या तो आपली ‘बॉडी’ कमाविण्याचा प्रयत्न करत आहे. ‘उडता पंजाब’साठी शाहीदने विशेष अभ्यास करायला सुरुवात केली आहे.
‘उडता पंजाब’मध्ये शाहीद कपूरसह आलिया भट्ट, करिना कपूर आणि अन्य कलाकार आहेत. या चित्रपटात शाहीद नेमक्या कोणत्या ‘लुक’मध्ये दिसतो त्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांनाही लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा