बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला कॅन्सर झाल्याचं वृत्त गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आहे. या वृत्तानंतर अखेर शाहिदनं मौन सोडत या साऱ्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. मी पूर्णपणे बरा आहे अशी माहिती त्यानं ट्विटद्वारे चाहत्यांना दिली आहे.

एका वेबसाइटनं शाहिदचं नाव न घेता बॉलिवूडमधल्या सुप्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला पोटाच्या कॅन्सरची लागण झाल्याचं वृत्त दिलं होतं. तेव्हापासूनच शाहिदच्या नावाची चर्चा सुरू झाली. इतकंच नव्हे तर उपचारासाठी शाहिद मुंबईबाहेर गेल्याचीही अफवा होती. परंतु, या सर्व चर्चा खोट्या असून शाहिदची प्रकृती ठीक असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं होतं. आता शाहिदनं देखील ट्विट करत आपली प्रकृती उत्तम असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

मी पूर्णपणे बरा आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका अशी माहिती शाहिदनं ट्विटरवर आपल्या चाहत्यांना दिली आहे. सध्या शाहिद त्याच्या ‘कबीर सिंग’ या आगामी चित्रपटात व्यग्र आहे. तेलगु सुपरहिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हा रिमेक असणार आहे.

Story img Loader