‘विवाह’,’ इश्क विश्क’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता शाहिद कपूर ‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांसह समिक्षकांनीही दाद दिली. त्यामुळेच ‘कबीर सिंह’नंतर शाहिदच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली असून आता त्याच्याकडे चित्रपटांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या शाहिद ‘जर्सी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे मात्र, त्याने धर्मा प्रोडक्शनचा एक चित्रपट करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.
‘बॉलिवूड हंगामा’नुसार, ‘जर्सी’ चित्रपटासोबतच शाहिद ‘योद्धा’ या चित्रपटात झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता शाहिद या चित्रपटाचा भाग नसणार आहे. शाहिदने स्वत: हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. ‘योद्धा’ या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येत असून त्याचं दिग्दर्शन शशांक खेतान करत आहेत.
View this post on Instagram
‘जर्सी’चं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर शाहिद ‘योद्धा’च्या चित्रीकरणास सुरुवात करणार होता.परंतु, या चित्रपटातील काही भाग न पटल्यामुळे त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.
‘योद्धा’मधील काही भाग शाहिदला पटले नव्हते त्यामुळे ते काढून टाकावे किंवा त्यात बदल करावा असं शाहिदचं मत होतं. मात्र, त्याचं हे मत चित्रपट निर्मात्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे शाहिदने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. दरम्यान, ‘कबीर सिंह’ या चित्रपटाच्या यशानंतर शाहिदने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. त्यासोबतच सध्या तो भूमिकेपेक्षा चित्रपटांच्या कथेवर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत.