अभिनेता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर लवकरच ‘जर्सी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. करोनाचा वाढता प्रसार पाहता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. शाहिद आणि मृणाल या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटासाठी दोघंही खूप उत्सुक आहेत. ‘कबीर सिंह’प्रमाणेच शाहिद कपूर या चित्रपटातही आपल्या गर्लफ्रेंडसोबत बाइकवर फिरताना आणि रोमान्स करत असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळालं. पण त्यांच्या या रोमान्समुळे एक पोलीस कर्मचारी शाहिदवर रागावला होता. ज्याचा किस्सा शाहिदनं नुकताच शेअर केला.
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांनी जर्सीच्या प्रमोशनसाठी ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी शाहिदनं या पोलीस कर्मचाऱ्याचा किस्सा सांगितला. शाहिद म्हणाला, ‘जेव्हा शूटिंग सुरू होतं तेव्हा मृणाल ठाकूरसोबत बाइकवर रोमान्स करतानाचा सीन पाहिल्यांनंतर तिथे असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला राग आला होता. त्यानंतर त्यांना शांत करण्यासाठी आम्ही लहान मुलासोबत बाइकवरील सीन शूट केला. ज्यामुळे या चित्रपटात मी एका मुलाच्या वडीलांची भूमिका साकारली आहे हे त्यांना खरं वाटावं.’
शाहिद पुढे म्हणाला, ‘मला लहान मुलं आणि प्राण्यांसोबत सीन शूट करण्याची खूप भीती वाटते. कारण ते नेहमीच त्यांच्या मूडनूसार किंवा मर्जीने वागत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रिदमला अडथळा निर्माण होतो. तसेच कोणताही सीन शूट करण्यासाठी त्यांना बराच वेळ लागतो.’
‘जर्सी’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबतच पंकज कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी या चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. शाहिद हा पंकज कपूर यांचा मुलगा आहे. मात्र या दोघांनी बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर एकत्र काम केलेलं नाही.