वीस वर्षांपूर्वी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चे चित्रीकरण सुरू असताना पुढे जाऊन हा चित्रपट सुपरहिट ठरेल असा विचार इथे असलेल्या कुणाच्याही मनाला शिवला नव्हता. ‘बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है’ हा माझाच संवाद मला हल्ली नेहमी कौतुकाने ऐकवला जातो. तेव्हा तो माझ्यासाठी अनेक संवादांपैकी निव्वळ एक संवाद होता. लोकांना तो चित्रपट आवडला आणि त्यांनी आजवर हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे. चाहत्यांच्या या अशा प्रेमामुळेच सुपरस्टार आपली वाटचाल झाली असून पन्नासावा वाढदिवसही नेहमीप्रमाणे चाहत्यांच्या गर्दीतच साजरा करणार असे शाहरूखने सांगितले.

बॉलीवूडचा बादशहा, किंग खान म्हणून ज्याचा प्रेमाने उल्लेख केला जातो त्या शाहरूख खानने सोमवारी वयाची पन्नाशी पूर्ण केली. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करून शाहरूख मुंबईत परतला आहे. पन्नासावा वाढदिवस खास असला तरी प्रत्येक वाढदिवस नेहमीच घरच्यांपेक्षा चाहत्यांबरोबरच साजरा होतो, असे अनुभवाचे बोल त्याने सांगितले.

वाढदिवसाची सुरुवातच घराबाहेर चाहते जमले आहेत या घरच्या मंडळींच्या वाक्याने होते. दिवसभरात ‘मन्नत’समोर जमलेल्या अनेक चाहत्यांच्या स्वीकारायच्या, प्रसिद्धी माध्यमांना भेटायचे, पुन्हा चाहत्यांसमोर जायचे या गडबडीत घरचेही माझ्यासोबत सहभागी असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळे सेलिब्रेशन सहसा होत नाही, पण घरच्यांनाही आता त्याची सवय झाल्याचे शाहरूखने ‘दिलवाले’च्या निमित्ताने झालेल्या गप्पांमध्ये सांगितले.

सध्या ‘दिलवाले’ नंतर ‘फॅन’ आणि ‘रईस’ अशा तीन निरनिराळ्या चित्रपटांमधून तीन वेगवेगळ्या लुक्समधून शाहरूख प्रेक्षकांसमोर येणार आहे. कारकीर्दीच्या या टप्प्यावर मनासारखे चित्रपट करायला मिळत आहेत याबद्दल समाधान व्यक्त करतानाच ‘रेड चिली एण्टरटेन्मेंट’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून अगदी वेगळ्या पद्धतीचे दर्जेदार चित्रपट करायचा मानस शाहरूखने व्यक्त केला. रेड चिलीज् या कंपनीच्या निर्मितीमध्ये चांगल्या लोकांची टीम आपल्यासोबत बांधली गेली असून त्यांच्या मदतीने या कंपनीला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचे आपले स्वप्न असल्याचे शाहरूख म्हणाला.

 

Story img Loader