नव्वदच्या दशकात सुपरहिट ठरलेली शाहरुख खान-काजोल यांची रोमॅण्टिक जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’पासून पडद्यावर हिट असलेली ही जोडी चार वर्षांपूर्वी ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात दिसली होती. आता रोहित शेट्टीच्या चित्रपटात हे दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत. ‘दिलवाले’ असे या चित्रपटाचे नाव असून हा कुठल्याही चित्रपटाचा रिमेक, सीक्वेल वगैरे नाही असे स्पष्ट करून संपूर्ण कौटुंबिक करमणुकीचा चित्रपट असेल, असे रोहित शेट्टीने जाहीर केले आहे.  
आता प्रश्न असा आहे की, शाहरुख-काजोल ही जोडी पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहायला जाणारा प्रेक्षक वर्ग असला तरी हे दोघेही मागच्या पिढीतील असल्यामुळे आजचा तरुण प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहात जाईल का? परंतु यावर रोहित शेट्टीने नामी उपाय शोधून काढला आहे.
तो म्हणजे शाहरुख-काजोलची जोडी असली तरी त्यासोबत वरुण धवन-कीर्ती सनोन अशी आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारी नवीन जोडीही ‘दिलवाले’ चित्रपटात असेल. त्यामुळे चित्रपटाचे रंजनमूल्य आणि ‘स्टार मूल्य’ दोन्ही वाढेल याकडे दिग्दर्शक-निर्मात्यांनी बारकाईने पाहिले आहे हे निश्चित.
बॉलीवूड स्टार कलावंतांच्या अलीकडच्या पद्धतीप्रमाणेच ‘दिलवाले’ या चित्रपटाची निर्मिती किंग खानची कंपनी रेड चिलीज् एण्टरटेन्मेंट आणि रोहित शेट्टीची कंपनी एकत्रितरीत्या करणार असून हा चित्रपट वर्षअखेरीला नाताळमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशामुळे शाहरुख खानची ‘संपूर्ण कौटुंबिक करमणूक करणारा नायक’ अशी प्रतिमा पुन्हा प्रस्थापित झाली होती. त्यामुळेच असे कौटुंबिक मनोरंजन करण्यासाठी दोघांनी पुन्हा एकदा युती केली असावी, असे मानायला हरकत नाही.  

Story img Loader