‘संजू’ हा चित्रपट २०१८मध्ये सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे आमीर खान आणि सलमान खाननंतर ३०० कोटींच्या गटात सामील झालेला रणबीर कपूर हा एकमेव कलाकार आहे. रणबीरच्या ‘संजू’मधल्या भूमिकेला प्रेक्षकांसह समिक्षकांनीही नावाजलं. आता राजकुमार हिरानी आणि रणबीर कपूर ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानसोबतही राजकुमार हिरानी लवकरच काम करणार आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खानने राजकुमार हिरानी यांची भेट घेतली आणि त्या दोघांनीही दोन संहितांबाबत चर्चा केली. यापैकी एक चित्रपट मुन्नाभाई मालिकेतला असेल ज्यात शाहरुखसोबत अजून एक कलाकार असेल. तर दुसरी संहिता ही रणबीर कपूरला आवडलेली आणि त्याच्यासोबत चर्चा झालेली आहे. रणबीर आणि राजकुमार हिरानी यांचा आगामी चित्रपट हा पीके चित्रपटाचा सिक्वेल नसून ही पूर्णपणे नवी संहिता आहे.

संजूच्या चित्रीकरणावेळी या संहितेबाबत रणबीर आणि राजकुमार यांच्यात चर्चा झाली होती. ती संहिता रणबीरला आवडलीही होती. पण कथेला एका ज्येष्ठ कलाकाराची गरज असल्याचं पिंकव्हिलाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या शाहरुखच्या चित्रपटाच्या उत्तरार्धावर काम चालू असल्याचंही कळत आहे.

जोपर्यंत संपूर्ण काम समाधानकारकरित्या कागदावर उतरत नाही, तोवर राजकुमार हिरानी चित्रपट बनवायला घेणार नाही असंही वृत्त आहे. एकदा का संहिता पक्की झाली ही चित्रीकरणाला फारसा वेळ लागणार नाही. रणबीरसोबत राजकुमार चित्रपट करत आहेत. लवकरच ह्या चित्रपटाचं कामही सुरु होईल. रणबीरने चित्रपटासाठी होकार दिलेला आहे. तसंच जेव्हा दिग्दर्शक म्हणेल तेव्हा वेळ द्यायला रणबीर तयार असल्याचंही कळत आहे.

रणबीरकडे सध्या भरपूर चित्रपट आहेत. ‘शमशेरा’, ‘ब्रम्हास्त्र’ तसंच लव रंजन याचा आगामी चित्रपट ज्याचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही अशा चित्रपटांमध्ये रणबीर लवकरच दिसणार आहे

Story img Loader