बॉलिवूडचे कलाकार आणि त्यांना भेटणारे काही भन्नाट चाहते यांचे किस्से-कहाण्या सर्वश्रुत आहेत. चाहते आपल्या लाडक्या कलाकारांना भेटण्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार होतात. याचाच एक नमुना शाहरुख खानला त्याच्या ‘दिल से नाचे इंडियावाले’ या शोमध्ये पहायला मिळाला.
‘झी टीव्ही’च्या आगामी ‘दिल से नाचे इंडियावाले’ या कार्यक्रमाच्या निवडप्रक्रियेसाठी शाहरुख खान, फरहा खान, दीपिका पदुकोण, सोनु सूद, बोमन इराणी आणि विवान शहा सगळी टीम मेहनत घेते आहे. या कार्यक्रमामध्ये दिल्लीला राहणारी परिचारिका नुरा जॉनने सादर केलेल्या नृत्यावर शाहरुख खान खूप खूश झाला आणि त्याने तिच्याविषयी अधिक माहिती विचारली. तेव्हा ती दिल्लीच्या ‘गंगा राम’ रुग्णालयामध्ये काम करत असल्याचे त्याला लक्षात आले. योगायोग म्हणजे शाहरुखचा जन्मही त्याच रुग्णालयात झाला असल्याने, तिच्याविषयी कळताच कुतूहलापोटी ‘माझा जन्म तुमच्याच हातून झाला नाही ना?’, हा प्रश्न त्याने तिला विचारला. पण ‘दुर्दैवाने आपण ती परिचारिका नसल्याचे’ नुराने त्याला सांगितले. पण, त्याचवेळी ‘आपण येथे केवळ शाहरुखवरील प्रेमापोटी आल्याचे जाहीर करत नुराने त्याच्यासोबत नाचायचे आपले स्वप्न पूर्ण करून घेतले.
तर दुसरीकडे मुंबईच्या निवडप्रक्रियेमध्ये कराडमधून आलेल्या एका चाहतीने आणलेली भेट पाहून शाहरुखच नाही तर इतर सर्वचजण थक्क झाले. कराडच्या मीनल भापरेने आपल्या सादरीकरणानंतर शाहरुखला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘आपण शाहरुखचे फार मोठे चाहते असून आयुष्यात एकदा त्याची भेट झाल्यास आपण त्याला स्वत: काहीतरी बनवून द्यायचे हे मी ठरवले होते’, असे तिने सांगितले. यावेळी तिने शाहरुखला देण्यासाठी एक अंगठी आणली होती. पण ती अंगठी इतकी मोठी होती की, शाहरुखने बोटामध्ये घालण्याऐवजी गळ्यामध्ये घालणे पसंत केले आणि सोबत ‘जर आपल्या नवऱ्यांना झुकवायचे असेल तर, सर्व बायकांनी अशी अंगठी आपल्या नवऱ्यासाठी बनवावी,’ अशी भावनाही व्यक्त केली.’

Story img Loader