सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी दररोज संवाद साधण्याबरोबरच आपले विचार पोहोचविण्यात अभिनयसम्राट अमिताभ बच्चनने आघाडी घेतली आहे. परंतु, आता आपल्या असंख्य चाहत्यांपर्यंत आपले ट्विटस पोहोचविण्यासाठी बॉलीवूड बादशहा शाहरुख खानने नवीन सेवा उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही मोबाइलवरून एक क्रमांक फिरवून मिस कॉल केला की तुमच्या मोबाइलवर शाहरुखने केलेले ट्विट्सचे एसएमएस मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा प्रकारे चाहत्यांशी संपर्क साधणारा जगभरातला तो पहिला सेलिब्रिटी ठरल्याचा दावाही करण्यात आला आहे.  
आतापर्यंत आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना ट्विट्रवर फॉलो करण्यासाठी तुमच्या मोबाइलवर इंटरनेट सुविधेची गरज भासत होती अथवा तुमच्या संगणकावरील इंटरनेटद्वारे फॉलो करावे लागत होते. परंतु, इंटरनेट न वापरणाऱ्या तसेच इंटरनेटची सुविधा मोबाइलवर न घेणाऱ्या शाहरुख खानच्या चाहत्यांना आता त्याचे ट्विट्स मिळण्याची सुविधा झिप डायलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ०९०१५५००५५५ या क्रमांकावर मिस कॉल करून शाहरुखचे ट्विट्स एसएमएसद्वारे मिळू शकतील. दरवर्षी ५० दशलक्ष चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. आपले चाहते आणि फॅन क्लब यांच्याशी डिजिटल माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर संपर्कात राहण्याचा प्रयत्न शाहरुख खान करतोय. सर्वसाधारण फक्त मूलभूत सोयी असलेले मोबाइल वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही ट्विटरवर खाते न उघडताही शाहरुख खानचे ट्विट्स एसएमएसद्वारे मिळणार आहेत.

Story img Loader