‘माझ्या चाहत्यांमुळे मी आहे..’ असा संवाद कित्येक प्रथितयश कलाकार सहज बोलून जातात. माझे ‘फॅन्स’ हा शब्द जेव्हा त्यांच्या तोंडून निघतो तेव्हा त्यात अधोरेखित असलेली किंवा गृहीत धरलेली आपुलकी कित्येक लोकांना त्याच्याशी जोडून जाते. मात्र खरोखरच त्यातल्या आपलेपणाच्या भावनेने जोडले गेलेले फॅ न्स कलाकारासमोर येऊन उभे राहिले तर.. अनर्थ होईल. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘फॅ न’ या चित्रपटात त्यातला सुपरस्टार आर्यन खन्नासमोर त्याचा सुपर‘फॅ न’ असलेल्या गौरव चांदनाच्या रूपाने असाच एक अनर्थ उभा राहतो. शाहरूखच्या आजवरच्या चित्रपटातील एकही लोकप्रिय गोष्ट या चित्रपटात नाही यासाठी दिग्दर्शकाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यामुळे एका अर्थाने आर्यन खन्ना हा खऱ्या अर्थाने शाहरूखचा चेहरा असूनही त्यात तो आपल्याला आर्यन म्हणूनच समोर येतो.

दिल्लीतील गल्लीबोळातून अभिनयाचे वारे पिऊन आलेला तरुण ते मुंबईत सुपरस्टार पदापर्यंतचा प्रवास हा एका अर्थाने शाहरूखचा खरा प्रवास आहे. त्यामुळे या चित्रपटात गौरवच्या निमित्ताने दिल्लीतला त्याचा वावर, मग ‘मन्नत’समोर शाहरूखच्या वाढदिवसाला चाहत्यांची होणारी खरी गर्दी त्याचे चित्रण आणि त्यात दिसणारा गौरव, खुद्द शाहरूखच्या बंगल्यातील चित्रीकरण अशा कितीतरी ओळखीच्या गोष्टी आपल्याला दिसतात. मात्र म्हणून आर्यन आणि गौरवच्या कथेचा आपल्याला विसर पडत नाही. त्याचे श्रेय दिग्दर्शक मनीष शर्माच्या मांडणीला द्यायला हवे. शाहरूखच्या ‘फॅ न’ची कथा ही प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट डी निरो याच्या ‘द फॅन’च्या कथेशी साधम्र्य राखणारी आहे हे सतत जाणवतं. आपण अमुक एकाचे फॅ न आहोत, त्यामुळे आपण त्याच्यासाठी जे काही करू ते त्याला आवडेल, या दृढ धारणेतून वावरताना नेमका त्याच्या विरुद्ध अनुभव आला तर तो ‘फॅ न’ काय करेल? हे या दोन्ही चित्रपटांचे मूळ कथासूत्र आहे. रॉबर्ट डी निरोच्या चित्रपटापेक्षा ‘फॅ न’ वेगळा ठरतो ते सुपरस्टार आणि त्याचा चाहता या दोघांमध्ये आजच्या घडीला जे वास्तव नातं निर्माण होऊ शकतं, त्याचं चित्रण यात पाहायला मिळतं.

आर्यनची नक्कल करणाऱ्या गौरवला गल्लीतील कार्यक्रमात नेहमीच पुरस्कार मिळतो. आर्यनच्या वाढदिवसाला त्याच्या घरी पोहोचून त्याला ट्रॉफी दाखवायची, तो ज्या पद्धतीने विनातिकीट मुंबईला पोहोचला, त्याच पद्धतीने रेल्वे प्रवास करून तो जिथे उतरला होता त्या लॉजच्या त्याच खोलीत रहायचे असा एका फॅ नचा जो वेडेपणा असेल त्याच पद्धतीने गौरव चांदना हा तरुण मुंबईत आर्यनच्या बंगल्यासमोर येऊन उभा राहतो. अनेक चाहत्यांप्रमाणे आपलाही आवाज त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही हे कळून चुकलेल्या गौरवला आर्यनला खूश करण्याची संधी सिद कपूर या कलाकाराच्या निमित्ताने मिळते. मात्र त्याच्या सुपरस्टारबरोबरची त्याची भेट तुरुंगातच घडते. ‘फॅ न’ म्हणून एका सुपरस्टारकडे पाच मिनिटांची भेट मिळावी म्हणून काहीही करणाऱ्या गौरवला माझ्या आयुष्याची पाच सेकंदही तुला का देऊ? असा उलटप्रश्न आर्यनकडून मिळतो. इथून पुढे गौरव आणि आर्यन यांचा एक जीवघेणा खेळ सुरू होतो. मुळात, आर्यन खन्ना हा सुपरस्टार म्हणून उगीचच माज असलेला कलाकार आहे आणि तो आपल्या ग्लॅमरच्या झोकात राहून गौरवला दूर सारतो आहे अशी भडक मांडणीच नाही आहे. फॅ न म्हणून गौरव चुकीच्या गोष्टी करतो आहे, या जाणिवेतून आर्यन त्याला फटकारतो. आपले वागणे चुकीचे नव्हते, याविषयी आर्यन ठाम आहे आणि आपल्या आवडत्या माणसाकडून साधी पाच मिनिटेही आपल्याला मिळाली नाहीत, याचा राग गौरवच्या मनात कायम आहे. या दोन परस्परविरोधी भूमिकांमधून घडणारा संघर्ष ‘फॅ न’मध्ये पाहायला मिळतो. गौरव आणि आर्यन या दोन्ही भूमिकेमध्ये शाहरूख वेगळा ठरला आहे. गौरवची देहबोली आणि आर्यनची देहबोली कमालीची वेगळी आहे. मात्र दोन्हीकडे खूप हातवारे करणारा, सारखी बडबड करणारा नेहमीचा शाहरूख कुठेही दिसत नाही. शाहरूखच्या वास्तव आयुष्याशी निगडित सगळ्या गोष्टींचे संदर्भ चित्रपटात वापरले आहेत, तरीही तिथे कुठेही शाहरूख हावी होत नाही. हा त्याचा पहिला चित्रपट आहे ज्यात एकही गाणे नाही. त्याचे ‘ककक ..’चे संवाद नाहीत. हा केवळ आणि केवळ शाहरूखचा चित्रपट आहे. चित्रपटात गौरव आणि आर्यनमधली पाठलागाची दीर्घ दृश्ये वापरण्यामागचा दिग्दर्शकाचा नेमका हेतू कळत नाही. चित्रपटाची कथाही थोडीशी थरारक पद्धतीची असल्याने हसऱ्या, आनंदी गौरवचे नकारी होत जाणे या गोष्टी त्यात गृहीत आहेत. त्यामुळे कथेचा शेवटही एका ठरावीक पद्धतीनेच होतो. म्हणूनच हा विषय अधिक वास्तव पद्धतीने मांडता आला असता, अशी चुटपुट लागून राहते. शाहरूखच्या बरोबरीने श्रिया पिळगावकरचा चेहरा आपल्याला प्रामुख्याने लक्षात राहतो. गौरवची मैत्रीण म्हणून छोटय़ाशा भूमिकेतही श्रिया लक्षात राहते. बाकी सगळा चित्रपट हा शाहरूखच्या अभिनयाचा ‘फॅ न’टास्टिक अनुभव आहे.

फॅन

दिग्दर्शक – मनीष शर्मा

निर्माता – आदित्य चोप्रा

कलाकार – शाहरूख खान, श्रिया पिळगावकर, दीपिका देशपांडे, वालुशा डिसूझा, योगेंद्र टिक्कू आणि सयानी गुप्ता

संगीत – विशाल-शेखर

 

Story img Loader