बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानसोबत काम करणे हे सिनेसृष्टीतल्या प्रत्येकाचेच स्वप्न असते. मग तो एखादा स्टार असू दे किंवा होतकरु कलाकार. प्रत्येकालाच शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा असते. त्यात शाहरुखसाठी त्याच्या चाहत्यांचे प्रेम हे तर सगळ्यांनाच माहित आहे. पण त्याची एक चाहती आहे चक्क पाकिस्तानची नावाजलेली अभिनेत्री माहिरा खानची आई. माहिराने एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तिच्या आईला कळले की, ती शाहरुख खानसोबत काम करणार आहे, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते.
माहिराला अनेक दिवस हे स्वतःला समजावणए कठीण गेले की ती खरंच शाहरुखसोबत काम करत आहे. माहिराने सांगितले की, जेव्हा तिच्या आईला कळले की ती शाहरुखसोबत काम करणार आहे. त्याच क्षणाला रडायला लागली. कदाचित माहिराच्या आईसारखेच इतर चाहत्यांची प्रतिक्रियाही काहीशी अशीच असेल. पण माहिराने ज्या पद्धतीने आपल्या आईची नक्कल केली, ती फारच हसू आणणारी होती.
माहिरा आईची नक्कल करताना सांगते की, जेव्हा तिच्या आईला कळले की शाहरुखसोबत ही काम करणार आहे, तेव्हा तिच्या कानांवर विश्वासच बसेना. म्हणून तिची आई तिला परत परत विचारत होती की हे नक्की आहे ना? प्रत्येकवेळा हो म्हटल्यावर तिची आई अजून जोरजोरात रडायला लागायची. तू खोटं बोलत आहेस असेच तिची आई रडता रडता बोलत होती. हा किस्सा सांगताना माहिराने ज्यापद्धतीने आईची नक्कल केली ती पाहून तिथे उपस्थित सगळेच हसायला लागले. माहिराचा हा व्हिडिओ @usmanghafoor या नावाने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे.
‘रईस’ हा सिनेमा गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती सिनेमाचे कथानक फिरताना दिसणार आहे. दरम्यान सिनेमातील भूमिका उठावदार करण्यासाठी शाहरुख खानने लतीफच्या मुलाची भेट घेतली होती. लतिफचा मुलगा मुश्ताक अहमदने शाहरुखला सहकार्य देखील केले. पण आता त्याने शाहरुखकडे १० कोटीची मागणी केल्याची चर्चा आहे. मुश्ताकने पैशाची मागणी केल्यानंतर शाहरुखने त्याला भेटण्यास टाळाटाळ केली होती. इंग्रजी वृत्तपत्र ‘डिएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुश्ताकने शाहरुखकडे १० कोटीची मागणी केली आहे. तसेच सध्या शाहरुखच्या सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी मुश्ताक तयारी करत असल्याची देखील चर्चा होत आहे. माहिरा आणि शाहरुख यांचा रईस हा सिनेमा पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.