‘जिंदगी’ वाहिनी सुरू झाल्यानंतर फवाद खान, माहिरा खान आणि फरहत इश्तिआक ही तीन नावे ठळकपणे लोकांसमोर आली. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे फरहत इश्तिआक या पाकिस्तानी लेखिकेच्या कांदबरीवर आधारलेली आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेली मालिका ‘हमसफर’. पाकिस्तानमध्ये सर्वात मोठी प्रेक्षकसंख्या मिळवणारी ‘हमसफर’ ही मालिका ‘जिंदगी’ वाहिनीवर भारतीय प्रेक्षकांसाठी रुजू होते आहे. या मालिकेवर बॉलिवूडपट झालाच तर ‘हमसफर’मधील जोडप्याच्या भूमिकेत शाहरूख खान आणि करीना कपूर खान शोभून दिसतील अशी भावना फरहत यांनी व्यक्त केली आहे.
‘जिंदगी’ वाहिनीवर आत्तापर्यंत दाखवण्यात आलेल्या पाकिस्तानी मालिकांचे इथे चांगलेच स्वागत झाले आहे. मानवी भावभावनांमधील नाटय़, मसाला ही इथल्याही प्रेक्षकांची गरज राहिली आहे. मात्र, तरीही ‘जिंदगी’च्या निमित्ताने मालिकांच्या विषयांमधले नाविन्यही प्रेक्षकांना भावले असल्याने वाहिनीने चांगलाच टीआरपी मिळवला आहे. त्यात ‘हमसफर’सारख्या मालिेकची आता भर पडणार आहे. ‘हमसफर’मध्ये अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘खूबसूरत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला फवाद खान हा इथल्याही तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. मात्र, ‘खूबसूरत’मध्ये फवादला समीक्षकांचीही पसंती मिळाली आहे, चित्रपटाने चांगले यशही मिळवले आहे आणि तरीही ‘हमसफर’ ही त्याच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या मालिकेला भारतात कसा प्रतिसाद मिळतोय या विचाराने त्याला दडपण आल्याचे त्याने सांगितले. ‘हमसफर’ या कादंबरीवर जेव्हा मालिका काढण्याचा विचार झाला आणि त्यात फवाद-माहिरा भूमिका करणार आहेत हे कळल्यानंतर आपल्याला खूप आनंद झाला होता, असे फरहत इश्तिआक यांनी सांगितले. मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला, लोकांनी ही मालिका डोक्यावर घेतली. आता भारतात त्याला कसा प्रतिसाद मिळतो याबद्दल उत्सूकता असल्याचे फरहत म्हणतात. ‘हमसफर’ची कथी इतकी नाजूक आणि नाट्यमय अशी प्रेमकथा आहे. त्यामुळे त्याच्यावर बॉलिवूडपट तयार व्हायला हवा, अशी इच्छा फरहत यांनी व्यक्त केली. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्ये यावर चित्रपट काढायचाच झाला तर मालिकेचे नायक-नायिका अशर (फवाद) आणि खिराद (माहिरा) यांच्या भूमिका शाहरूख खान आणि करीना कपूर खान उत्तम वठवू शकतील, असे आपल्याला वाटत असल्याचेही फरहत यांनी सांगितले. ’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा