बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित हिट अँड रन खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सल्लुमियाँच्या अनेक हितचिंतकांनी त्याची भेट घेतली. यामध्ये अभिनेता शाहरूख खानसह बॉलीवूडमधील अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी झालेल्या भेटीत शाहरूख आणि सलमान यांच्यात तासभर चर्चा झाली. एकेकाळी शीतयुद्धासाठी प्रसिद्ध असणारे शाहरूख आणि सलमान खान काही दिवसांपूर्वी सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या लग्नाच्यावेळी गुणागोविंदाने नांदताना दिसले होते. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली होती. त्यामुळेच सलमानच्या भविष्यावर दुरगामी परिणाम करु शकणाऱ्या हिट अँड रन खटल्याच्या निकालापूर्वी शाहरूखने सलमानची भेट घेऊन त्याला धीर दिला. दरम्यान, सलमान खानची बहीण अर्पिता, तिचा नवरा आयुष आणि त्याचे दोन्ही बंधू अरबाज व सोहेल खान हेदेखील गॅलेक्सी अपार्टमेंट येथे उपस्थित होते. याशिवाय, सलमान खानशी मित्रत्वाचे संबंध असलेले दिग्दर्शक डेव्हिड धवन, साजिद नादियालवाला, माजी आमदार बाबा सिद्दीकी, शायना एनसी यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक बड्या मंडळींनी मंगळवारी सलमान खानची भेट घेतली. 
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खानवर चालविण्यात येणाऱ्या खटल्याचा निकाल आज सकाळी ठीक ११ वाजून १५ मिनिटांनी सत्र न्यायालय देणार आहे.

Story img Loader