अभिनेता शाहरुख खान मागच्या काही दिवसांपासून दिवगंत गायिका लता मंगेशकर यांच्या अंत्य संस्कारांच्या वेळी प्रार्थना करण्याच्या पद्धतीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाजवळ प्रार्थना केल्यानंतर मुस्लीम पद्धतीप्रमाणे त्यानं फुंकर मारली. पण याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही युजर्सनी शाहरुखला सोशल मीडियावर ट्रोल केलं. तर काहींनी त्याचं कौतुक केलं होते. त्यानंतर आता शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर राघव जुयालनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शाहरुखच्या एका जुन्या मुलाखतीचा असून यामध्ये तो देशाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये शाहरुख म्हणतो, ‘मला आठवतंय जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला एक निबंध लिहायला सांगितला होता. ‘माझा भारत देश’ मला वाटतं हे बदललं पाहिजे. ते ‘भारत एक देश आहे आणि आपण सर्व त्या देशाचे रहिवासी आहोत’ असं असायला हवं. कारण आपण या देशाचे मालक नाही आहोत. मालकी हक्काचा अर्थ असा नाही की हा फक्त आपलाच देश आहे. याचा अर्थ आपण आपल्या देशासाठी काय करायचं आहे. पण या संदर्भात बोलायचं तर जे अँटी नॅशनल किंवा अँटी सोशल असं जे काही आहे ते हेच लोक यामध्ये येतात जे स्वतःला या देशाचा भाग समजत नाहीत.’
शाहरुख पुढे म्हणाला, ‘मला हे सर्व पाहून खूप दुःख होतं कारण माझ्या कुटुंबीयांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. देशासाठी लढाई लढली आहे. अशावेळी मला माझ्या वडिलांनी सांगितलेल्या ओळी आठवतात. ‘या देशाला तसंच स्वतंत्र ठेव जसं मी तुला देत आहे.’असं ते एकदा मला म्हणाले होते.’