पूर्वी बॉलीवूडच्या कलावंतांचे धूम्रपान हे त्यांच्या ‘स्टाइल स्टेटमेंट’चा भाग होते असे मानले जाते. परंतु जगभरात धूम्रपानविरोधी, तंबाखूविरोधी मोहीम गेल्या काही वर्षांत जोर धरू लागल्यानंतर कलावंतांचे सिगारेट ओढणे याविषयी प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर न उमटला तरच नवल. सिगारेटचे व्यसन म्हटले की बॉलीवूड बादशहा अर्थात शाहरूखचे नाव नेहमी आघाडीवर असते. तो म्हणे ७० की १०० सिगारेट दिवसभरात ओढतो असे त्याच्याविषयी बोलले जाते. पण तो धूम्रपान करणे सोडणार आहे. म्हणजे त्यानेच नुकते ‘वुई डोन्ट टॉक टू पीपल हू स्मोक’ असे इंग्रजीत लिहिलेले स्वत:चे तीन फोटो ट्विटरवर टाकले असून धूम्रपानाची सवय सोडणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. आपला सिनेमा नजीकच्या काळात प्रदर्शित होणार नसला तरी चर्चेत राहण्याची किमया किंग खानला चांगलीच जमते हे यावरून नक्कीच म्हणता येईल.
शाहरूख खानच्या या ट्विटरवरील टिवटिवीला आणखी महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे ‘फॅन’ हा त्याचा आगामी चित्रपट. शाहरूखच्या चाहत्यांमध्ये मोठी संख्या बच्चे कंपनीची आहे. त्यामुळे बच्चे कंपनीला या चित्रपटासाठी चित्रपटगृहात खेचून आणायचे आहे. त्यासाठीही त्याने धूम्रपानाची सवय सोडणार असल्याचे जाहीर केले असावे, अशीही चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली आहे. खुद्द त्याची मुलगी सुहानानेही त्याला ‘युथ आयकॉन’ पुस्कार मिळाल्यानंतर तुमच्यासारखी सतत धूम्रपान करणारी व्यक्ती तरुणांचा आदर्श असू शकत नाही म्हणून त्याच्यावर टीका केली होती. तेव्हाही दुखावलेल्या शाहरूखने आपण धूम्रपान सोडणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याला ते शक्य झालेले नाही.
किंग खानच्या खालोखाल कपूर घराण्यातील स्टार कलावंत रणबीरचेही नाव घेतले जाते. रणबीरच्या नावाआधी संजय दत्तचे नाव धूम्रपानासाठी घ्यावे लागले. सैफ अली खान हाही ‘चेनस्मोकर’ म्हणून ओळखला जातो. धूम्रपानाची सवय सोडणाऱ्यांमध्ये विवेक ओबेरॉयचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यानंतर तो चक्क जागतिक आरोग्य संघटनेचा तंबाखूविरोधी प्रवक्ता बनला. अजय देवगणचे सिगारेट ओढतानाचे खूप फोटो प्रसिद्ध झाले नसले तरी तोसुद्धा म्हणे ‘चेनस्मोकर’ आहे. अभिनेता इरफान खानने त्याचे पहिले नाटक केले तेव्हा त्याला धूम्रपानाची सवय जडली अशी कबुली दिली होती.

Story img Loader