सध्या करण जोहर निर्मित अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. करण जोहर हे व्यक्तिमत्व तसंकायम चर्चेत असतं, मग ते स्टारकिड्सना घेऊन चित्रपण बनवणं असो का त्याच्या खास कार्यक्रमामधील गॉसिप असो. याबरोबरच करण जोहरवर एनआरआय लोकांचा दिग्दर्शक म्हणूनही लेबल लावलं जातं. याची सुरुवात झाली त्याच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटापासून.
‘कभी खुशी कभी गम’ हा करण जोहरचा चित्रपट त्याकाळात बॉक्सऑफिसवर खूप चालला. सगळी स्टार मंडळी या चित्रपटात असल्याने भारत तसेच भारताबाहेरील प्रेक्षकही या चित्रपटाचं कौतुक करत होता. चित्रपटातली गाणीसुद्धा प्रचंड गाजली होती. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, काजोल, करीना कपूर, हृतिक रोशन, जया बच्चन अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट तेव्हा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. याच चित्रपटादरम्यान सेटवर बरंच नकारात्मक वातावरण असायचं असा खुलासा खुद्द करण जोहर याने केला आहे.
या चित्रपटाच्या दरम्यान शाहरुखचे आधीचे काही चित्रपट आपटले होते. हृतिक रोशन पहिल्याच चित्रपटामुळे स्टार झाला होता, अमिताभ बच्चन यांची दुसरी इनिंग जोरात सुरू झाली होती. अशात शाहरुखने या सेटवरील कलाकारांपासून अंतर ठेवायला राहायला सुरुवात केली. करण जोहर सांगतो, “शाहरुखचे काही चित्रपट फ्लॉप झाले होते. हृतिक स्टार असल्यामुळे मीडियामध्ये पुढला सुपरस्टार हृतिकच असणार अशा चर्चा रंगत होत्या, वास्तविक पाहता शाहरुखपेक्षा हृतिक खूपच लहान होता आणि कामाचा अनुभवही तसा कमीच होता. या सगळ्यामुळे सेटवर शाहरुख हृतिकपासून शक्यतो लांब राहत असे, एकप्रकारचा दुरावा आणि नकारात्मकता त्यामुळे सेटवर निर्माण झाली होती.”
आणखी वाचा : करण जोहरने दिलेली ५ कोटीची देणगी भारतीय सैन्याने नाकारली होती; किस्सा होतोय पुन्हा व्हायरल
‘कभी खुशी कभी गम’ सुपरहिट ठरला पण या एकंदर वातावरणामुळे पुन्हा करण जोहरने कधीच या दोघांना एकत्र घेऊन चित्रपट करण्याचं धाडस केलं नाही. करण सध्या त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’च्या आणि हृतिक त्याच्या ‘विक्रम वेधा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शाहरुखचे येत्या काळात तब्बल ४ चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.