आजकाल बॉलिवूडचे अनेक कलाकार चित्रपटाच्या चित्रीकरणाला येताना आपापल्या व्हॅनिटी व्हॅन घेऊन येताना दिसतात. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अनेक सुखसुविधा असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करने बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन कशी आहे याचा खुलासा केला आहे.

एका एंटरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वरा भास्करने शाहरुखच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनमधील लक्झरी सुविधांचा खुलासा केला आहे. शाहरुख सर्वात जास्त त्याच्या व्हॅनमध्ये चिल करणारा माणूस असल्याचे स्वराने सांगितले. त्याने त्याच्या व्हॅनमधील बाथरुमची अशी व्यवस्था केली आहे की बाथरुममध्ये बसून देखील बातम्या पाहता आणि ऐकता येतात. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत कोट्यावधी रुपये आहे. या व्हॅनमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शाहरुख खानसारखी आलिशान व्हॅनिटी व्हॅन कुणाकडे नसल्याचा खुलासा स्वराने केला आहे. ‘या व्हॅनमध्ये केवळ टेकनिकल गोष्टींचीच नाही तर मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. या व्हॅनमधील बाथरुम तीन खोल्यांइतके मोठे आहे’ असे स्वरा म्हणाली आहे.

यापूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचे व्हॅनिटी व्हॅनसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अल्लू अर्जुनने ती खास स्वत:साठी Reddy Customद्वारे तयार करु घेतली आहे. या व्हॅनची किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहे. तसेच या व्हॅनवर ‘AA’ असा लोगो काढण्यात आला आहे. ही व्हॅन काळ्या रंगाची असून व्हॅनच्या आत देखील काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.