किंग खान शाहरुख खान हा त्याच्या आगामी ‘पठाण चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तब्बल ३ वर्षांनी शाहरुख रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटासाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तो आणि ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टी एका चित्रपटात झळकणार आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटांनी आज बॉलिवूडच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. कांतारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. ‘केजीएफ’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मितीची बाजू सांभाळली आहे. हाऊस होम्बाले प्रॉडक्शन असं या निर्मिती संस्थेचे नाव असून ते आता शाहरुख खानला घेऊन एका चित्रपटाच्या निर्मितीच्या तयारीत आहेत. ज्यात रिषभ शेट्टी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा सुरु आहे.
‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत
या चित्रपटाच्या बाबतीतलं आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्याने शाहरुख बरोबर ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटात काम केले आहे. शाहरुख खान आणि रिषभ शेट्टी ही जोडी एकत्र पडद्यावर बघण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. मात्र अद्याप निर्मिती संस्थेने याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. सोशल मीडियावर यावर चर्चा सुरु आहे.
शाहरुखचा ‘पठाण’ २०२३ च्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. शिवाय दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याबरोबर शाहरुख ‘डंकी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर अभिनेत्री तापसी पन्नूही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘डंकी’ हा चित्रपट पुढच्यावर्षी डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात धडकणार आहे.