बॉलीवूड बादशाह शाहरूख खान याच्या दुखावलेल्या खांद्यावर मंगळवारी लीलावती रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. संजय देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमूने ही शस्त्रक्रिया केली. शाहरूखची तब्येत आता चांगली असून एक-दोन दिवस त्याला रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘चेन्नई एक्स्प्रेस’ या रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी हाणामारीचे स्टण्ट्स करताना शाहरूखच्या खांद्याला दुखापत झाली होती. मंगळवारी शस्त्रक्रियेच्या वेळी वडिलांसोबत असावे म्हणून लंडन येथे शिक्षण घेत असलेला शाहरुखचा मुलगा आर्यन हाही रुग्णालयात आला होता.
शाहरुखने यापुढे चित्रीकरणादरम्यान कोणत्याही स्वरुपाची हाणामारीची दृश्ये स्वत: न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्याला दिला आहे.