बॉलीवूडचे बडे कलावंत, त्यांच्या चाहत्यांना वेड लावणारे त्यांचे कपडे, त्यांची स्टाईल आणि त्यांचा पडद्यावरचा रुबाब.. सारेच चाहत्यांना आवडत असते. असा मोठा चाहतावर्ग असलेला शाहरूख खान आता स्वत:च एक ‘फॅन’ म्हणजे चाहता म्हणून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
यशराज फिल्म्स बॅनरचा सर्वात आवडता कलावंत असलेला शाहरूख खान आगामी वर्षांत या बॅनरच्या ‘फॅन’ या चित्रपटात झळकणार असून ‘शुद्ध देसी रोमान्स’चा दिग्दर्शक मनीष शर्मा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. ट्विटरवरून किंग खानने या चित्रपटाबाबत ट्विट केले आहे. तो म्हणतो, ‘आतापर्यंत मी साकारलेल्या व्यक्तिरेखा मी तयार केलेल्या असायच्या. प्रथमच या चित्रपटामधील व्यक्तिरेखा अशी आहे की त्यामुळे माझा उदय झाला आहे.’ थोडक्यात म्हणजे चांगल्या व्यक्तिरेखा, स्टारडम, प्रसिद्धीचे वलय, मानसन्मान हे जे काही कलावंतांना मिळते ते त्यांच्या प्रचंड मोठय़ा संख्येने असलेल्या चाहत्यांमुळेच. म्हणूनच शाहरूखने अशा पद्धतीचे ट्विट केले असावे. आपल्या कारकिर्दीच्या एका उंचीवर पोहोचल्यानंतर एका बडय़ा कलावंताचा चाहता अशी व्यक्तिेरखा साकारण्याची संधी शाहरूखला मिळत असून स्टारपदी पोहोचल्यानंतरही तो अशा पद्धतीची व्यक्तिरेखा साकारायला तयार झाला आहे. ‘जब तक है जान’नंतर एसआरके पुन्हा एकदा यशराज फिल्म्स बॅनरच्या चित्रपटातून २०१४मध्ये झळकणार आहे.  दिग्दर्शक मनीष शर्माने ‘फॅन’ हा कौटुंबिक चित्रपट असल्याचे म्हटले असून एप्रिल-मे २०१४ मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले जाणार आहे.