बॉलिवूडमध्ये मैत्रीची अनेक उदाहरणं दिली जातात. अमिताभ बच्चन यांची धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत जीवलग मैत्री असून त्याचे अनेक किस्से आहेत. अशीच मैत्री एकेकाळी बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा आणि राजेश खन्ना यांच्यात होती. दोघांमधील ही मैत्री चित्रपट ‘आज का MLA रामअवतार’ चित्रपटापासून सुरु झाली होती. पण एक वेळ अशी आली की दोघांमधील ही मैत्री कायमची संपली.
1991 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लालकृष्ण आडवाणी यांचा गुजरातमधील गांधीनगर आणि दिल्ली अशा दोन्ही मतदारसंघात विजय झाला होता. त्यावेळी आडवाणी यांनी दिल्लीच्या जागेवरुन राजीनामा दिला होता. जून 1992 रोजी त्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार होती. आडवणी यांच्या सांगण्यावरुन भाजपाने शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने सुपरस्टार राजेश खन्ना यांना मैदानात उतरवलं.
दोन्ही अभिनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने वातावरण एकदम फिल्मी झालं होतं. प्रचारादरम्यान दोन्ही अभिनेत्यांची डायलॉगबाजी ऐकायला मिळत होती. याचवेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्या तोंडून निघालेल्या एका वाक्यामुळे राजेश खन्ना दुखावले गेले आणि त्यांच्यातील मैत्री कायमची संपली.
प्रचारादरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी राजेश खन्ना यांचा मदारी म्हणून उल्लेख केला. याचं उत्तर राजेश खन्ना यांनी निवडणूक 25 हजार मतांनी जिंकून दिलं. राजेश खन्ना यांना निवडणुकीत 52.51 टक्क्यांसहित 1 लाख 1 हजार 625 मतं मिळाली. तर शत्रुघ्न सिन्हा यांना 37.91 टक्क्यांसहित 73 हजार 369 मतं मिळाली. राजेश खन्ना निवडणूक जिंकले असले तरी शत्रुघ्न सिन्हा यांना आपला केलेला अपमान ते आयुष्यभर विसरले नाहीत. शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेकदा माफी मागूनही राजेश खन्ना यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना माफ केलं नाही.
शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘एनिथिंग बट खामोश’ या आपल्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी लिहिलं आहे की, ‘त्या निवडणुकीत पराभव होणे माझ्या निराशेतील दुर्मिळ क्षणांपैकी एक होता. तो पहिला क्षण होता जेव्हा मी रडलो’. पुढे त्यांनी सांगितलं आहे की, राजेश खन्ना यांच्याकडे मी माफी मागितली, पण ते कधीच माझ्याशी बोलले नाहीत. आडवाणी माझ्यासाठी एकदाही प्रचाराला आले नाहीत याचंही मला दुख: होतं.