कलाविश्वात आजवर बऱ्याच कलाकारांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. अशाच कलाकारांच्या गर्दीत काही नावं मात्र कुठेतरी हरवून गेली. अर्थात ती पूर्णपणे हरवली असं नाही. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री शकीलाचं. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अडल्ट स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच अभिनेत्रीच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. शकीलाच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये अभिनेत्री रिचा चड्ढा महत्त्वाची भूमिका साकारत असून, नुकताच या चित्रपटाचा पोस्टर सर्वांच्या भेटीला आला आहे.
या पोस्टरमध्ये अंगभर सोन्याचे दागिने घातलेली रिचा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री शकीलाच्या आयुष्यातील ग्लॅमरस भाग जणू हा पोस्टर दर्शवतो. तर दुसरीकडे तिच्या मागील भिंतीवर वर्णावरून, दिसण्यावरून शेलक्या शब्दांत टीकाटिप्पणी केल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टरसोबतच एक टॅगलाइन निर्मात्यांनी दिली आहे. ‘शकीला- नॉट अ पॉर्न स्टार’ अशी ही टॅगलाइन आहे.
रिचाने ही व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर अधिक प्रभावी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच शकीलाची भेटही घेतली होती. चित्रपटाच्या दृष्टीने आपण साकारत असलेल्या पात्रातील बारकावे टीपण्यासाठीच तिने शकीलाची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे.
Bold and fearless.
PRESENTING THE FIRST LOOK OF #Shakeela! @lankeshindrajit @ShakeelaFilm pic.twitter.com/SJx1oCea6q— TheRichaChadha (@RichaChadha) November 20, 2018
शकीलाने १९८० मध्ये तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किन्नरा तुंबिकल’ Kinnara Thumbikal या चित्रपटातून ती खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय ठरली होती. शकीलाविषयी मल्याळम चित्रपटसृष्टी आणि संपूर्ण कलाविश्वात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. एक अडल्ट स्टार असणं नेमकं काय असतं आणि शकीलाच्या आयुष्यात नेमकी कोणती वळणं आली होती, याचं चित्रण या बायोपिकमधून करण्यात येणार असल्याचं कळत आहे.
वाचा : ‘नेटफ्लिक्स’च्या ‘जंगल बुक’मध्ये बॉलिवूडचे ‘राम-लखन’ आणि ‘धकधक गर्ल’
खुद्द रिचाने तिच्या या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली होती. ‘या चित्रपटातून शकिलाच्या आयुष्यातील अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून प्रसिद्धीझोतात येण्यापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे. तिच्या आयुष्याच्या आतापर्यंतच्या प्रत्येक वळणावर लूकही बदलत होते. माझ्यासाठी हेच मोठं आव्हानच होतं. पण, एक अभिनेत्री म्हणून या माध्यमातून माझंच कौशल्य आणखी खुलवण्यात मदत झाली. शकीला ही खरंच एक अद्वितीय व्यक्ती आहे आणि मी आशा करते की या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही तिच्या कारकिर्दीला पूर्णपणे न्याय देऊ’, असं रिचा म्हणाली. इंद्रजित लंकेशने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून, जवळपास दोन दशकं कलाविश्वात प्रसिद्धीझोतात असणाऱ्या या अभिनेत्रीचा प्रवास प्रेक्षकांना पाहता येणार आहे.