गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर चांगलीच गाजत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शेवंताची भूमिका साकारणारी अपूर्वा नेमळेकर आणि माईची भूमिका साकारणारी शंकुतला नारे तर लोकप्रिय आहेतच. ऑनस्क्रीन जरी या दोघींमध्ये शत्रुत्व दाखवण्यात आलं असलं तरी ऑफस्क्रीन मात्र दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत.

अपूर्वा आणि शंकुतला ऑफस्क्रीन अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. सोशल मीडियावरही दोघींची मैत्री पोस्ट आणि फोटोद्वारे पाहायला मिळते. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वाने सांगितलं, ‘मी शकुंतला यांचा फार आदर करते. त्या माझ्यापेक्षा अनुभवानेही मोठ्या आहेत. त्यांना विविध नाटकांमध्ये काम करताना पाहूनच मी लहानाची मोठी झाले. आतासुद्धा मी सेटवर त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकते.’

शकुंतलासोबत असलेल्या नात्याविषयी ती पुढे सांगते, ‘रिअल लाइफमध्ये त्या मला माझ्या आईसारख्या आहेत. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी सारख्याच आहेत. मी ऑनलाइन साइट्सवरून काही खरेदी करत असेन तर त्यांच्यासाठीही नक्की घेते.’

अपूर्वाने याआधी झी मराठीवरच आभास हा, एकापेक्षा एक जोडीचा मामला यात काम केलं होतं. झी युवावरच्या प्रेम या मालिकेतही ती होती. अपूर्वा ज्वेलरी डिझायनिंगही करायची. 2015मध्ये तिचा स्वत:चा अपूर्वा कलेक्शन ब्रँडही होता.