शालिनी पासी नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाइव्ह्स वर्सेस बॉलीवूड वाइव्स’ या शोमधून रातोरात प्रसिद्ध झाली. या शोच्या तिसऱ्या सिझनची सुरुवात तिच्या भव्य पार्टीने झाली, ज्यामध्ये तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने सर्वांचे लक्ष वेधले. या शोमुळे लोकांना तिच्या आयुष्यात अधिक रस निर्माण झाला. गेल्या काही महिन्यांत, तिने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती दिली. एका मुलाखतीत शालिनीने सांगितले की ती कॉलेजमध्ये असतानाच वयाच्या २० व्या वर्षी तिचे लग्न झाले. मात्र, तिला लवकर लग्न केल्याबद्दल अजिबात खंत नाही. उलट, तिने याला “विश्वाचा सर्वात चांगला निर्णय” म्हटले.
शालिनीचे लग्न PASCO ग्रुप चे मालक संजय पासी यांच्याशी झाले. संजय यांच्या कुटुंबाने शालिनीला तिच्या शाळेतल्या मैत्रिणीच्या लग्नात पाहिले होते. तिच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी शालिनीच्या पालकांशी बोलून त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आणि अशाप्रकारे तिचे लग्न ठरले.
‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीत शालिनी म्हणाली, “हा माझ्यासाठी युनिव्हर्सचा (विश्वाचा) खूप चांगला निर्णय होता, कारण तेव्हा माझ्यात खूप ऊर्जा आणि उत्साह होता. महिलांमध्ये वय वाढल्यावर ऊर्जा कमी होते आणि शरीराची रीकव्हरी वेगळी असते. लहान वयात आपण लवकर सावरतो. मी २१ व्या वर्षी आई झाले. माझा मुलगा खेळण्यांच्या दुकानात गेला की त्याच्यापेक्षा मीच अधिक उत्साही व्हायचे.”
“माझ्या लग्नासाठी काही अटी होत्या”
शालिनीने लग्नासाठी होकार देण्यापूर्वी काही अटी ठेवल्या होत्या. ती म्हणाली, “मी माझ्या पालकांना सांगितलं की, मी अशा व्यक्तीशी लग्न करेन जी दारू पित नाही, सिगारेट ओढत नाही आणि जुगार खेळत नाही.” तिने सांगितले, “माझं पालनपोषण माझ्या आजी-आजोबांनी केलं, जे दारू, सिगारेट याला पूर्णपणे विरोध करत. आमच्या घरी खेळायला पत्तेसुद्धा ठेवले जात नसत. त्यामुळे मी ही अट ठेवली.”
शालिनी पुढे म्हणाली, “माझ्या लग्नासाठीच्या अटी मी माझ्या आईला सांगितल्यावर ती म्हणाली, ‘ठीक आहे, शुभेच्छा.’ पण मला संजय सापडला. जेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी माझ्या वडिलांना सांगितलं की संजय दारू पित नाही आणि सिगारेट ओढत नाही, तेव्हा त्यांना वाटलं की ते खोटं बोलत आहेत.”
लग्न झाल्यावर शालिनीला नव्या घरात जुळवून घेण्याचे मोठे आव्हान होते. ‘साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी’ अशी मूल्ये असलेल्या घरात वाढलेल्या शालिनीला पार्ट्या आणि भव्य सोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या कुटुंबाचा भाग व्हावे लागले. यामुळे तिच्या आयुष्यात मोठे बदल झाले. ती म्हणाली, “समाजातील लोकांनी माझ्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे मी ‘होस्टिंग’चं कौशल्य आत्मसात केलं.”
कलेची आवड
शालिनी पासी तिच्या कलेप्रती असणाऱ्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. ती गाणं गाते, नृत्य करते आणि समाजसेवेचंही काम करते.