मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुण यांच्यातील प्रेमकथेवर आधारित ‘इसकजादे’ या चित्रपटातील ‘मै परेशां, परेशां’ हे गाणे गाऊन बॉलिवुडमध्ये स्वतंत्र ठसा उमटवणारी मराठमोळी गायिक शाल्मली खोलगडे प्रथमच मराठी चित्रपटातील दोन गाण्यांना आवाज देणार आहे. सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटात शाल्मली गाणार असून करण कुलकर्णी हा मराठी संगीतकार चित्रपटाला संगीत देणार आहे. करणने यापूर्वी शहीद आणि पेडलर्स या दोन हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे.
एव्हरेस्ट एन्टरटेंटमेंटच्या ‘हॅप्पी जर्नी’ या चित्रपटासाठी शाल्मली खोलगडे आणि करण कुलकर्णी ही दोन नावे विशेष म्हणता येतील. बॉलिवूडमधील दोन चित्रपटांना संगीत दिल्यानंतर करण कुलकर्णी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत काम करत आहे. करण याने ऑस्ट्रेलियातील विद्यापीठातून संगीत विषयक पदवी मिळविली आहे. शाल्मलीने ‘हॅपी जर्नी’ चित्रपटात ‘फ्रेश’ आणि ‘आकाश झाले’ ही दोन गाणी गायली आहेत. यातील एक अंगाई गीत आहे. चित्रपटात अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. करण कुलकर्णी सारख्या तरुण संगीतकाराने दिलेल्या ‘फ्रेश’ संगीताचे स्वागत कसे होते, याकडे चित्रपट सृष्टीचे लक्ष लागले आहे.